रेल्वेद्वारे मनमाड ते इंदूर थेट होणार प्रवास, वाचणार आता ४ तास, १८ हजार कोटींच्या नव्या रेल्वेमार्गाला मंजुरी; कृषी, पर्यटनवाढीला मिळणार चालना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 07:43 AM2024-09-03T07:43:57+5:302024-09-03T07:44:18+5:30
Manmad to Indore Railway: मनमाडपासून मध्य प्रदेशातील इंदूर शहरापर्यंत ३०९ किमी लांबीचा नवा रेल्वेमार्ग बांधण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिली. या प्रकल्पासाठी १८,०३६ कोटी रुपये खर्च होणार आहेत. ही माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
नवी दिल्ली - मनमाडपासून मध्य प्रदेशातील इंदूर शहरापर्यंत ३०९ किमी लांबीचा नवा रेल्वेमार्ग बांधण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिली. या प्रकल्पासाठी १८,०३६ कोटी रुपये खर्च होणार आहेत. ही माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. हा प्रकल्प २०२८-२९पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईपासून इंदूरपर्यंतच्या प्रवासातील २०० किमी अंतर कमी होणार आहे.
या प्रकल्पाद्वारे १०२ लाख मानवी दिवस इतका रोजगार निर्माण होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र व मध्य प्रदेशमधील महत्त्वाच्या भागांतील दळणवळणाचे प्रमाण वाढणार आहे. वैष्णव यांनी सांगितले की, या प्रकल्पाला पंतप्रधान गती शक्ती अंतर्गत कार्यरत असलेल्या नेटवर्क प्लॅनिंग ग्रुपने आता चालना दिली आहे.
मालवाहतूक हाेणार सुलभ
नव्या रेल्वेमार्गामुळे कृषी उत्पादने, कंटेनर, खते, लोहखनिज, सिमेंट, पेट्रोलियम, तेल आणि वंगण यांची वाहतूक करणे अधिक सुलभ होणार आहे. सुमारे २६ एमटीपीए (दशलक्ष टन प्रतिवर्ष) इतकी अतिरिक्त मालवाहतूक होईल.
फायदा काय?
महाराष्ट्र व मध्य प्रदेशमधील सहा जिल्हे जोडले जातील. त्या भागात दळणवळण वाढणार.
मध्य प्रदेशातील बाजरी उत्पादक जिल्हे, महाराष्ट्रातील कांदा उत्पादक जिल्ह्यांना दळणवळणाचे साधन उपलब्ध होईल.
मनमाड-इंदूरमधील नवीन रेल्वेमार्गामुळे पर्यटनवाढीलाही मदत. श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरासह उज्जैन-इंदौर परिसरातील पर्यटनस्थळांना फायदा होईल.
इंदूरसाठी सध्या लांबचा प्रवास
- मुंबईहून इंदूरला जाण्यासाठी सध्या दाेन पर्याय आहेत. एक पर्याय म्हणजे, मुंबई सेंट्रल येथून पश्चिम रेल्वेने रतलाम, नागदा, उज्जैन व इंदूर असा ८२८ किलाेमीटर लांबीचा मार्ग.
- दुसरा पर्याय म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून भाेपाळमार्गे इंदूर गाठणे. त्यासाठी भाेपाळ येथे ट्रेन बदलावी लागते. हे एकूण अंतर १,११० किलाेमीटर आहे.
- नवा मार्ग जवळपास ६०० किलाेमीटर एवढा आहे. त्यामुळे किमान ४ तास वाचणार आहेत.
उद्योगांनाही लाभ
पीथमपूर ऑटो क्लस्टर हे या रेल्वेमार्गाद्वारे मुंबईजवळील जेएनपीए बंदर व अन्य राज्यांतील बंदराशी जोडले जाईल. पीथमपूर ऑटो क्लस्टरमध्ये ९० मोठे कारखाने व ६०० लहान व मध्यम श्रेणीतील
उद्योग आहेत.