सुरेश भटेवरा,
सुलतानपूर- उत्तर प्रदेशच्या सुलतानपूर जिल्ह्यात पाच लहानशा खेड्यांत चमकदार पिवळ्या रंगाने सजलेल्या छोट्या घरकुलांचे मालकी हक्क मंगळवारी भाजपचे तरुण खासदार वरुण गांधींनी २८ गरीब कुटुंबांच्या स्वाधीन केले. ही घरे कोणत्याही सरकारी योजनेतून अथवा खासदार निधीतून तयार झालेली नसून, वरुण गांधींनी आपल्या खासदारकीच्या मासिक वेतनातून व स्वत:च्या कमाईतून बांधून दिली आहेत. अशी एकुण १00 घरे गरीबांना देण्याची मोहीम वरुण गांधीनी हाती घेतली असून, आणखी ७२ घरांचे बांधकाम सध्या सुरू आहे. या मोहिमेचे चळवळीत रूपांतर करण्याची तयारी खा. गांधींनी चालवली आहे. दिल्लीहून लोकमतच्या प्रस्तुत प्रतिनिधीसह निवडक पत्रकारांना मंगळवारी वरुण गांधींनी या कार्यक्रमाला नेते होते. बेला मोहन, सैतापूर सराय, पगडी सराय, मल्हिपूर, पदारथपूर गावांमधे या निमित्ताने सरासरी दोन हजार ग्रामस्थांच्या ५ छोटेखानी सभांत त्यांनी भाषणे केली. ते म्हणाले, ‘राजकीय पक्षाशी अथवा निवडणुकीच्या राजकारणाशी ही मोहीम संबंधित नाही. उत्तरप्रदेशच्या गरीब ग्रामस्थांची व कर्जग्रस्त शेतकऱ्यांची दैना दूर करण्यासाठी योजलेल्या एका सामाजिक चळवळीची ही छोटी सुरुवात आहे.लवकरच या मोहिमेची वेबसाईट व मोबाइल अॅप तयार करण्यात येईल. त्या डिजिटल व्यासपीठावर उत्तरप्रदेशच्या गरीब कुटुंबांना साऱ्या जगाशी जोडले जाईल. कोणत्याही सरकारी मदतीशिवाय राबवल्या जाणाऱ्या या मोहिमेद्वारे दोन वर्षांत गरीब कुटुंबांना १0 हजार घरे व १0 हजार शेतकऱ्यांना पूर्णत: कर्जमुक्त करण्याचा संकल्प आहे. स्वत:च्या मालकीचे पक्के घर गरीब कुटुंबांना मिळावे व कर्जग्रस्त शेतकऱ्यांवर आत्महत्येचा प्रसंग ओढवू नये हा या मोहिमेचा हेतू आहे. उत्तरप्रदेशात या मोहिमेला यश मिळाल्यास ही चळवळ देशव्यापी बनवण्याचा इरादा आहे, असेही त्यांनी बोलून दाखवले.>लोकवर्गणीतून शेतकऱ्यांची कर्जमुक्तीशेतीच्या न संपणाऱ्या समस्या आणि कर्जाचे ओझे यामुळे आत्महत्येसाठी प्रवृत्त झालेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी वरूण यांनी उत्तरप्रदेशात दुसरी अभिनव चळवळही सुरू केली आहे. आपल्या खासदारकीचे गेल्या चार वर्षांचे १ कोटी ६0 लाखांचे संपूर्ण वेतन तर कर्जमुक्तीसाठी वरूणनी दिलेच; याखेरीज आग्रा, मेरठ, मुजफ्फरनगर, बिजनोर, बहराईच, लखीमपूर खिरी, प्रतापगड, अलिगड, सुलतानपूर, सीतापूर, मोरादाबाद अशा २0 जिल्ह्यांत फिरून गरीब शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी धनिक वर्गामधे जागरूकता निर्माण करण्यातही यश मिळवले. कर्जमुक्तीच्या या अभिनव चळवळीत सधन समाज गटही उत्साहाने सहभागी झाला आहे. आजवर १७ कोटी ८0 लाख रूपयांचे योगदान स्वत:हून त्यांनी दिले. त्यातून ३२६0 शेतकरी कुटुंबे पूर्णत: कर्जमुक्त करण्याचे यश वरुण गांधींना मिळाले. कर्जमुक्तीची ही मोहिम राबवण्यापूर्वी वरूण गांधी व त्यांच्या स्थानिक कार्यक र्त्यांच्या टीमने प्रशासन व बँकांशी संपर्क साधला. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीची सविस्तर माहिती मिळवली. दुष्काळ व नैसर्गिक आपत्तीमुळे सलग ३ वर्षे ज्यांची पिके नष्ट झाली, कर्जाचा बोजा वाढत गेला आणि शेतजमिनीखेरीज कोणतीही अचल संपत्ती ज्या शेतकऱ्यांकडे नाही, या तीन ३ प्रमुख निकषांनुसार गरजू कर्जग्रस्त शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली. त्यानंतर स्थानिक वकील, व्यापारी, उद्योजक, सधन शेतकरी अशा विविध समाज घटकांच्या बैठका घेतल्या. त्यात या गरजवंत शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले. या मोहिमेतून जवळपास १७ कोटी ८0 लाख रूपयांचा निधी उभा राहिला. तो गरजू शेतकऱ्यांना या दानशूरांच्या हस्ते लगेच वितरित करण्यात आला.