लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : ॲपलच्या आयफोनचे जगभरात चाहते आहेत. नवा आयफोन खरेदी करण्यासाठी लोक आतुरतेने वाट पाहतात, तसेच दुकानांसमोर रांगा लावतात. भारतातही आयफोनचे चाहते आहेत; पण केरळमधील धीरज पाल्लियीस (२८) यांच्यासारखा चाहता शोधून सापडणार नाही. नवा आयफाेन-१४ प्रो खरेदी करण्यासाठी धीरज चक्क दुबईला गेला. त्यासाठी त्याने केवळ प्रवास तिकीट आणि व्हिसा यावर ४० हजार रुपये खर्च केले.
आयफोन-१४ दुबईत लाँच झाला आणि त्यानंतर एक दिवस उशिराने तो भारतातही लाँच झाला; पण एवढी प्रतीक्षाही धीरज करू शकला नाही. त्याने विमान पकडून दुबई गाठली आणि तेथील प्रसिद्ध मिर्दीफ सिटी सेंटरमध्ये आयफोन-१४ प्रो खरेदी केला. विशेष म्हणजे आयफोन खरेदीसाठी रांगेत उभ्या असलेल्या लोकांत धीरज अग्रभागी होता. आयफोन-१४ प्रोची प्रारंभिक किंमत १,२९,९०० रुपये आहे. भारतात-१४ च्या १२८ जीबीच्या बेस मॉडेलची किंमत ७९,९०० रुपये आहे. ५१२ जीबीची किंमत १,०९,९०० रुपये आहे.
धीरज हा व्यावसायिक असून, डिजिटल कन्सल्टन्सी संस्थेचा संचालक आहे. त्याला आयफोनचे प्रचंड वेड आहे. याआधी २०१७ मध्येही त्याने दुबईत जाऊन आयफोन-८ खरेदी केला होता. २०१९ मध्येही तो आयफोन-११ प्रोमॅक्स खरेदी करण्यासाठी दुबईला गेला होता. आयफोन-१२ आणि आयफाेन-१३ खरेदी करणारा पहिला भारतीय होण्याचा मान त्याने पटकावला होता.