लोकसभा निवडणुकीपूर्वीच सुरत मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार मुकेश दलाल यांना बिनविरोध विजयी घोषित करण्यात आले आहे. छाननीवेळी काँग्रेस उमेदवार नीलेश कुंभाणी यांचा अर्ज बाद झाल्यानंतर अन्य उमेदवारांनीही अर्ज मागे घेतल्याने सुरतचे भाजपा उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध निवडून आले. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ पारधी यांनी मुकेश दलाल यांच्या विजयाची घोषणा करत त्यांना प्रमाणपत्र दिले. दरम्यान, याबाबत मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्टद्वारे एक सवाल उपस्थित केला आहे. नोटाचा पर्याय असतानाही तो राबवलाच गेला नाही तर त्याला 'बिनविरोध' कसं म्हणणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
"माझ्या मनात एक प्रश्न आहे. कमी ज्ञानामुळे असेल पण तरी.. जेव्हा एखाद्या ठिकाणी मतदान न होता थेट विजयी घोषित केलं जातं (ताजं उदाहरण सूरत) तेव्हा तिथल्या मतदारांच्या नोटा (NOTA: None of the Above) निवडण्याच्या अधिकारावर गदा येत नाही का? मला पूर्ण कल्पना आहे की NOTA मोजलं गेलं तरी ते ग्राह्य धरलं जात नाही (जे ग्राह्य धरलं गेलं पाहिजे हा भाग वेगळा) पण तरीही मतदाराला 'वरील पैकी कोणीच नाही' हे निवडता आलंच पाहिजे ना? काहीही कारणांमुळे जरी एकच उमेदवार शिल्लक राहिलाय तरीही तो उमेदवार विरूद्ध NOTA अशी दुरंगी लढत होऊ देत ना. निवडून तोच येईल पण मतदानाचा हक्क तर बजावता येईल आणि त्या उमेदवाराविषयीचं लोकांचं खरं मत तरी कळेल. NOTA नसतंच तर भाग वेगळा पण असतानाही ते राबवलंच गेलं नाही तर त्याला 'बिनविरोध' कसं म्हणणार", असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
दुसरीकडे, सुरत लोकसभा जागेवर भाजपाचे उमेदवार मुकेश दलाल यांच्या बिनविरोध विजयानंतर काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. मुकेश दलाल यांना अनावश्यक प्रभावातून विजयी घोषित केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या जागेवर नव्याने निवडणुका घ्याव्यात, अशी काँग्रेसची मागणी आहे. काँग्रेसने असा दावा केला आहे की, भाजपाला व्यापारी समुदायाची भीती वाटत होती, त्यामुळेच त्यांनी सूरत लोकसभा मतदारसंघात मॅच फिक्सिंगचा प्रयत्न केला.
दरम्यान, गुजरातमधील सर्व २६ जागांसाठी तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान आहे. त्यासाठी अर्ज मागे घेण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. सुरत मतदारसंघातील बसपाचे प्यारेलाल भारती, तीन छोटे पक्ष व चार अपक्षांनी आपला अर्ज मागे घेतला. तत्पूर्वी छाननीवेळी कॉंग्रेसचे नीलेश कुंभाणी यांच्या अर्जावरील सूचकांच्या स्वाक्षरी बनावट आढळल्याने अर्ज बाद ठरविला होता. कुंभाणी यांच्याऐवजी डमी उमेदवार असलेले सुरेश पडसाला यांचाही अर्ज बाद झाला होता. त्यामुळे भाजपाचे मुकेश दलाल हे बिनविरोध विजयी झाले. त्यामुळे गुजरातमध्ये आता केवळ २५ जागांसाठी मतदान होईल.