संभल येथील हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांचं सांत्वन करण्यासाठी आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी निघालेले लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि त्यांच्या भगिनी प्रियंका गांधी यांना गाझीपूर बॉर्डर येथे अडवण्यात आले. दरम्यान, राहुल गांधी यांच्या संभल दौऱ्यावरून इंडिया आघाडीतीलकाँग्रेस आणि समाजवादी पक्षामध्ये मतभेद असल्याचे समोर आले आहे. राहुल गांधी यांच्या संभल दौऱ्यावर समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार रामगोपाल यादव यांनी टीका केली आहे.
रामगोपाल यादव म्हणाले की, काँग्रेस पक्ष संसदेत संभलमधील हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करत नाही. मात्र राहुल गांधी संभलच्या दौऱ्यावर जात आहेत. आता याला काय म्हणावं. काँग्रेस केवळ औपचारिकता निभावत आहे. पोलीस त्यांना तिथे जाऊ देणार नाहीत.
दरम्यान, काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना संभलमध्ये जाऊ न देण्याच्या स्थानिक प्रशासनाच्या निर्णयावर टीका केली आहे. हा निर्णय म्हणजे हुकूमशाही आहे. आमच्या नेत्यांना रोखलं जात आहे. आम्ही शांततापूर्वक मार्गाने संभलला जात होतो. मात्र आम्हाला रोखण्यात येत आहे. संभलमध्ये दंगल झाली म्हणून आम्ही तिथे जात आहोत. तिथे जाणं हा आमचा अधिकार आहे, असे जयराम रमेश म्हणाले.