INDIA Block Agenda Meeting: केंद्रातील मोदी सरकारची सत्ता उलथून टाकण्यासाठी स्थापन झालेल्या INDIA आघाडीतील नेत्यांमध्ये आता मतभेद झाल्याची माहिती समोर आली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी अनेक मुद्द्यांवर विरोधी आघाडीत एकमत नाही. एकीकडे गौतम अदानी आणि ईव्हीएमचा मुद्दा सभागृहात उपस्थित व्हावा, अशी काँग्रेसची इच्छा आहे, तर दुसरीकडे जनतेशी थेट संबंध असलेले मुद्दे सभागृहात मांडले जावेत, अशी इतर विरोधी पक्षांची इच्छा आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी इंडिया आघाडीची बैठक बोलावली होती, ज्याचे नेतृत्व राहुल गांधी करत होते. यावेळी राहुल यांनी 'क्रोनी कॅपिटलिझम' आणि 'ईव्हीएम' च्या मुद्द्यांवर भर देण्याची आग्रह केला. विशेष म्हणजे, इंडिया आघाडीचा भाग असलेल्या तृणमूल काँग्रेसचे नेते या बैठकीत सामील झाले नाहीत. आम्हाला सामान्य लोकांच्या प्रश्नांवर मोदी सरकारचा सामना करायचा आहे. लोकांना क्रोनी कॅपिटलिझम आणि ईव्हीएमसारखे मुद्दे आवडत नाहीत, अशी भूमिका टीएमसीने मांडली.
सपा आणि आम आदमी पक्षही काँग्रेसपासून दूर..?टीएमसी, समाजवादी पार्टी (एसपी) आणि आम आदमी पार्टी (आप) सारखे मित्रपक्ष काँग्रेसच्या ईव्हीएम आणि क्रोनी कॅपिटलिझमच्या मुद्द्यांवर उत्साही नाहीत. काँग्रेसने ‘भारत जोडो’च्या धर्तीवर ‘ईव्हीएम जागो यात्रे’ची योजना आखली असून, इंडिया आघाडीच्या पक्षांना त्यात सामील होण्याचे आमंत्रण दिले आहे. पण, बहुतांशी पक्षांनी त्याला फारसा रस दाखवलेला नाही. तसेच, ज्या राज्यांमध्ये काँग्रेसचे सरकार आहे, त्या राज्यांतून ही यात्रा जाणार का? असा सवालही काहींनी केला आहे.
TMC कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करू इच्छिते?TMC स्पष्टपणे म्हणते की, त्यांच्या पक्षाच्या खासदारांना जनतेशी संबंधित मुद्द्यांवर मोदी सरकारचा सामना करायचा आहे, ज्यात महागाई, बेरोजगारी, शेतकरी, खते आणि मणिपूर हिंसाचार यासारख्या मुद्द्यांचा समावेश आहे. यासोबतच या मुद्द्यांसह संभल हिंसाचाराचे प्रकरणही जोडले जावे, अशी सपाची इच्छा आहे. सपा खासदार धर्मेंद्र यादव म्हणाले की, आमच्यासाठी शेतकरी आणि संभल हिंसाचार, हा अदानींपेक्षा मोठा मुद्दा आहे.