शीलेश शर्मा
नवी दिल्ली, दि. 11 : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निकालामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली असून, संदीप दीक्षित यांनी अप्रत्यक्षरीत्या राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी राहुल गांधी यांचे समर्थन केले असले तरी पक्ष संघटनेत आमूलाग्र बदल करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशात आम्ही वाईट पद्धतीने हरलो आहोत, हे स्वीकारायला हवे. संघटनेत व्यापक बदल करावे लागतील. रणनीतीवरही मंथन करावे लागेल. काँग्रेस निवडणूक हरली असली, तरी आमची भूमिका कायम आहे. नोटाबंदी हा चुकीचा निर्णय होता, असे आम्ही आजही मानतो.
सूत्रांनी सांगितले की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला पक्षातून कोणीही आव्हान दिलेले नसले तरी बदलाची भाषा सर्वच करीत आहेत. राहुल गांधी यांनी आपल्या आजूबाजूला घुटमळणाऱ्या नेत्यांपासून स्वत:ची सुटका करून घेणे आवश्यक आहे. उदा. सोनिया गांधी यांचे सचिव अहमद पटेल हे आजकाल पूर्ण अंधारात असतात. पक्षात काय निर्णय होत आहेत, याची त्यांना कल्पनाच नसते. उत्तर प्रदेश निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी राहुल गांधी यांनी प्रशांत किशोर यांना आणले होते. त्यावरून अनेक ज्येष्ठ नेते नाराज झाले होते. सपासोबत युती करण्याचा सल्ला प्रशांत किशोर यांनीच दिला होता. त्याला गुलाम नबी आझाद, अहमद पटेल, प्रमोद तिवारी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांचा विरोध होता.
तथापि, राहुल यांची टीम ठाम राहिली. निवडणूक प्रचारासाठी काँग्रेसने निवडणूक आयोगाला नेत्यांची लांबलचक यादी दिली होती. तथापि, संपूर्ण प्रचार अभियान राहुल यांच्याभोवतीच फिरत राहिले. नवज्योतसिंग सिद्धू, नगमा, दिग्विजयसिंग यांच्यासह अनेक नेत्यांचा उपयोग काँग्रेसला करता आला असता; पण हे नेते प्रशांत किशोर यांच्या यादीत नव्हते. त्यामुळे त्यांना दूरच ठेवण्यात आले. सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांनी प्रचारात भागच घेतला नाही. २0१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर झालेल्या निवडणुकांतही त्याचीच पुनरावृत्ती झाली; मात्र काँग्रेसने संघटनात्मक पातळीवर कोणतेही बदल केले नाहीत. उत्तर प्रदेशातील मोठ्या पराभवानंतर काँग्रेसला संघटनात्मक बदल करावे लागतील, असे मानले जात आहे. कार्यसमितीच्या बैठकीत याचे पडसाद उमटणे अपरिहार्य समजले जात आहे.