आपल्या गावावर संकट येणार, २४ तास आधीच ८ वीच्या मुलीने केलेली वायनाड भूस्खलनाची भविष्यवाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 08:44 AM2024-08-02T08:44:13+5:302024-08-02T08:44:30+5:30
वायनाडवरील संकटाची भविष्यवाणी एक दिवस आधीच आठवीच्या मुलीने तिच्या गोष्टीत केली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी तिच्या गावावर हे संकट कोसळले आहे.
केरळच्या वायनाडमधून एक आश्चर्यचकीत करणारी बातमी येत आहे. वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत २८९ जणांचा मृत्यू झाला आहे. अद्याप अनेक लोक बेपत्ता आहेत. या वायनाडवरील संकटाची भविष्यवाणी एक दिवस आधीच आठवीच्या मुलीने तिच्या गोष्टीत केली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी तिच्या गावावर हे संकट कोसळले आहे.
वायनाड ट्रॅजेडीमध्ये केरळच्या एका १४ वर्षीय मुलीची गोष्ट चर्चेत आली आहे. लाया एएस नावाच्या या मुलीने शाळेच्या मॅग्झीनसाठी एक गोष्ट लिहिली होती. या मॅग्झीनचा डिजिटल अंक प्रकाशित करण्यात आला, त्याच्या दुसऱ्याच दिवशी तिने सांगितलेली कहानी खरी ठरली.
वायनाडमध्ये भूस्खलन झाल्याने वेल्लारमाला सरकारी शाळाही वाहून गेली. या घटनेत अनेक लोकांचा मृत्यू झाला. याच शाळेची ही मॅग्झीन होती. ती डिजिटली उपलब्ध झाल्याने लोकांच्या वाचनात आली आणि हा प्रकार समोर आला.
धक्कादायक बाब म्हणजे या भूस्खलनात लायाच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. लायाची ही गोष्ट सोमवारी सकाळी अपलोड करण्यात आली होती. याचे शीर्षक 'अग्रहतिंते दुरानुभवम' (इच्छेचे संकट) असे आहे. यामध्ये दोन मुलींचे पात्र रंगविण्यात आले आहे. यात एक बोलणारी चिमणी या गावावर मोठे संकट येणार आहे, पळून जा, असे सांगत आहे. एक काल्पनिक गोष्ट खरी ठरली आहे.