ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 16 - हिजबुल मुजाहिद्दीन दहशतवादी संघटनेचा कमांडर बुरहान वानीच्या खात्मा करण्यात आल्यापासून काश्मीर खो-यात हिंसाचार वाढला आहे. जवळपास गेल्या एक वर्षापासून काश्मीर खोरं धुमसत असतानाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आपल्या अखिल भारतीय प्रचारक संमेलनाचे आयोजन तेथे करणार आहे.
या संमेलनाचा मुख्य उद्देश म्हणजे काश्मीरमधील परिस्थिती लवकरच नियंत्रणात आली पाहिजे, असा संदेश केंद्रातील मोदी सरकारला देण्यासाठी आरएसएसनं येथे बैठक घेण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. 18 जुलै ते 20 जुलैपर्यंत चालणा-या या संमेलनात सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासहीत आरएसएसमधील अनेक प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहादेखील या बैठकीत सहभागी होण्याची शक्यता आहे.
जम्मू काश्मीरमध्ये गेल्या वर्षभरापासून स्थानिकांची आंदोलनं, भारतीय जवान-पोलिसांवर होणारी दगडफेक, सीमेपलिकडून होणारा गोळीबार आणि दहशतवाद्यांची घुसखोरीशिवाय होणा-या हल्ल्यांचं प्रमाण प्रचंड वाढले आहे. अशा परिस्थितीत काश्मीरमध्ये सरसंघचालक आरएसएसमधील नेते आणि कार्यकर्ते तेथे संमेलनासाठी दाखल होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचं सरकारसमोर मोठं आव्हान असणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षेसंदर्भात चिंता व्यक्त करण्यात आल्यानंतरही आरएसएसनं बैठकीचा निर्णय घेतला. "द एशियन एज"ने दिलेल्या वृत्तानुसार, आरएसएसनं जम्मू काश्मीरमधील संमलेनाचा निर्णय या वर्षाच्या सुरुवातीलाच घेतला होता, अशी माहिती एका ज्येष्ठ आरएसएस नेत्यानं दिली आहे. जम्मू काश्मीरमध्ये पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी (पीडीपी) आणि भारतीय जनता पार्टी (भाजपा)चे युतीचं सरकार आहे. पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती राज्याच्या मुख्यमंत्री आहेत तर भाजपाचे निर्मल सिंह येथील उप-मुख्यमंत्री आहेत.
दरम्यान, हिजबुल मुजाहिद्दीन दहशतवादी संघटनेचा कमांडर बुरहान वानी एका चकमकीत ठार झाल्यापासून काश्मीर खोरे अशांत झाले आहे. येथे प्रत्येक दिवशी मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळून येत आहे. गेल्या महिन्यात काश्मीर महिन्यात झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीदरम्यान सर्वाधिक कमी मतदान झाले आणि विविध झालेल्या हिंसाचारांच्या घटनांमध्ये 6 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच शाळकरी विद्यार्थ्यांकडून सुरक्षा दलातील जवान आणि पोलिसांना लक्ष्य करून त्यांच्यावर दगडफेक केली जात आहे.