- हरीश गुप्तानवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे मोदी सरकारविरुद्धच्या अविश्वास प्रस्तावावर शुक्रवारी बोलणार असून सर्वांचे लक्ष राहुल गांधी यांच्या भाषणाकडे लागले आहे. या चर्चेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. कारण, राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिलेले आहे की, जर त्यांना संसदेत राफेल आणि नीरव मोदी प्रकरणी १५ मिनिटे बोलण्याची संधी दिली तर, पंतप्रधान तिथे उभे राहू शकणार नाहीत.यावर्षी एप्रिलमध्ये काँग्रेसच्या ‘संविधान बचाव’ रॅलीत बोलताना राहुल गांधी यांनी संसदेचे कामकाज न चालल्याबाबत भाजपला जबाबदार ठरविले होत. ते म्हणाले होते की, देशातील समस्यांवर चर्चेपासून वाचण्यासाठी भाजप संसदेच्या कामात अडथळा आणत आहे. राहुल गांधी यांच्या टिप्पणीनंतर काँग्रेसच्या व्टिटर हँडलने एक मतदान जारी केले यात असे विचारण्यात आले की, संसदेतील १५ मिनिटांच्या चर्चेचे राहुल गांधी यांचे आव्हान स्वीकारण्याची हिंमत पंतप्रधान मोदी दाखवतील काय?भाजपने त्यानंतर आपल्या व्टिटर हँडलवरुन उत्तर देताना म्हटले आहे की, राहुलजी, आपण संसदेत बोलावे अशी आमची सर्वांची इच्छा आहे. अशाप्रकारची मजा आम्ही कशी सोडू शकतो? पक्षाने काही व्हिडिओही पोस्ट केले आहेत. पंतप्रधान मोदींसारख्या उत्कृष्ट वक्त्यांविरुद्ध राहुल गांधींच्या वक्तृत्व कौशल्याची ही चाचणी असणार आहे.काँग्रेसची ही समस्या आहे की, भाजपप्रमाणे त्यांच्याकडे लोकसभेत आक्रमक बोलणारे वक्ते नाहीत. त्यामुळे, सर्वांचे लक्ष आता काँग्रेसचे स्टार स्पीकर राहुल गांधी आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाषणाकडे लागले आहे. हे आता लपून राहिलेले नाही की, पंतप्रधान मोदी यांनीराहुल गांधी आणि कुटुंबीयांवर वारंवार शाब्दिक हल्ले केले आहेत. अलिकडेच राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवरील हल्ला तीव्र केला आहे. त्यामुळे शुक्रवारी होणारी ही चर्चा लक्षणीय ठरणार आहे.
अविश्वास प्रस्ताव: राहुल गांधींच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 2:37 AM