कोलकाता : नंदीग्राम येथील हल्ल्यात पायाला दुखापत झालेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी डॉक्टरांनी शुक्रवारी दिली. ममता बॅनर्जी यांच्यावर कोलकाता येथील एसएसकेएम रुग्णालयात उपचार सुरू होते. ममता यांची गुरुवारी प्रकृती स्थिर असली तरी त्यांच्या रक्तातील सोडिअमचे प्रमाण कमी झाले होते. मात्र शुक्रवारी त्यांची प्रकृती आणखी सुधारल्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.
नंदीग्राममधील हल्ल्यात जखमी झालेल्या आणि पायात प्लॅस्टर असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपण येत्या काही दिवसांतच पुन्हा प्रचारात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे. प्रसंगी व्हीलचेअरवरून प्रचार करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
या हल्ल्याची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. ममता बॅनर्जी यांची प्रकृती स्थिर असली तरी त्यांच्या रक्तातील सोडियमचे प्रमाण कमी झाले आहे. त्यांच्या डाव्या घोट्याला तसेच उजवा खांदा, हात, गळा व मानेलाही जखमा झाल्या आहेत. त्यांच्या पायाला प्लॅस्टर घातले आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. बुधवारी संध्याकाळी कार्यकर्त्यांशी बोलून त्या वाहनात शिरण्याच्या बेतात असतानाच वाहनाचा दरवाजा त्यांच्या पाठीमागून ढकलण्यात आला. त्यात त्या जखमी झाल्या. हा अपघात नसून, हल्लाच असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी काल केला होता.