नवी दिल्ली - ग्रेटर नोएडा येथील शारदा रुग्णालयातील एका डॉक्टराने 7 दिवसांपासून मृत्युशी झगडणाऱ्या अफगानी महिलेला जीवनदान दिलंय. गेल्या सात दिवसांपासून व्हेंटिटेलरवर असलेल्या 105 वर्षीय राबिया अहमद यांनी कोरोनावर मात दिलीय. डॉक्टरांनी व वैद्यकीय स्टाफने घेतलेल्या विशेष काळजीमुळे या 105 वर्षीय आजीबाईने कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली.
शारदा रुग्णालयातील सुपरिटेंडेंट डॉक्टर आशुतोष निरंजन यांनी सांगितले की, खासगी रुग्णालयातील तपासणीनंतर कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या राबिया यांना 16 जुलै रोजी शारदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ज्यावेळी, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यावेळी राबिया यांना ताप, श्वास घेताना त्रास आणि न्यूमोनियाचा आजार होता. अलजाइमर या आजारनेही त्या ग्रस्त होत्या. त्यामुळे, कुठल्या नातेवाईकांनाही त्या ओळखू शकत नव्हत्या, अशी प्रकृती त्यांची होती.
रुबिया यांना एक्यूट रिसपाइरेटरी ड्रिसट्रेस सिंड्रोम (एआरडीएस) या स्टेजवर येईपर्यंत व्हेंटीलेटवरच ठेवण्यात आले होते. त्यानंतर, आयसीएमआर आणि शारदा रुग्णालयातील नियमानुसार त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. 7 दिवस व्हेंटीलेटरवर राहिल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली. रुग्णालयातील सर्वच स्टाफ आणि डॉक्टरांच्या सेवेमुळे 15 दिवसांनंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे, कोरोनावर मात करुन 105 वर्षीय आजीने जगासमोर एक उदाहरण ठेवलं आहे. विशेष म्हणजे कोरोना आणि न्यूमोनिया या दोन्ही आजारांवर राबिया यांनी मात दिली.
डॉक्टरांनी आम्हाला बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कधीही न विसरण्याजोगे गिफ्ट दिल्याचे राबियाचे नातू अहमद फवाद यांनी म्हटलंय. तर, हा आमच्यावरील विश्वासाचा विजय असल्याचे डॉक्टर अजीत कुमार यांनी म्हटलं.