मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. एका व्यक्तीने कथावाचनाचे आयोजन केले होते. पण झाले असे की, कथा वाचायला आलेल्या कथाकाराच्या शिष्याने यजमानाच्या पत्नीलाच पळवून नेले. याप्रकरणी पीडित पतीने पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
महिनाभरानंतर तक्रारदाराची पत्नी सापडली, पोलिसांनी तिला पोलिस ठाण्यात बोलावून जाब विचारला. त्यानंतर महिलेने पतीसोबत राहण्यास नकार देत कथावाचक नरोत्तम दास दुबे यांच्यासोबतच राहण्याची इच्छा व्यक्त केली. विशेष म्हणजे, या प्रेम प्रकरणाची सुरुवात 2021 मध्येच झाली होती.
महिलेचा पती राहुल तिवारी यांनी गौरीशंकर मंदिरात कथावाचन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नरोत्तम दास दुबे त्यांच्या गुरूसोबत कथावाचनासाठी आले होते. कथेदरम्यान नरोत्तम दास दुबे आणि महिलेचे प्रेम जुळले.
दोघांचे फोनवर बोलणेही सुरू झाले. यानंतर गेल्या महिन्यात 5 एप्रिल रोजी महिला नरोत्तम दास दुबेसोबत पळून गेली. काही दिवसानंतर ती सापडली. तिला पोलिसांनी बोलावले. पोलिसांसमोर तिने पतीसोबत राहण्यास नकार दिला आहे. याप्रकरणी पोलीस तक्रार दाखल न करता तपास करत आहेत.