गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज असलेले आणि सातत्याने पक्षविरोधी भूमिका घेत असलेले ज्येष्ठ नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांची काँग्रेसने पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षशिस्तीचा भंग केल्याच्या आरोपाखाली आचार्य प्रमोद कृष्णम यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं आहे. २०१९ मध्ये लखनौ लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढवणारे प्रमोद कृष्णम हे काँग्रेसपासून आपली वाट वेगळी करणार असे संकेत मिळत होते. दरम्यान, ते काही निर्णय घेण्याआधीच काँग्रेसने त्यांना बाहेरची वाट दाखवली आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस ( संघटना) के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले की, आचार्य प्रमोद कृष्णम हे शिस्तभंग आणि वारंवार पक्षविरोधी विधानं करत असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्या विचारात घेऊन पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रमोद कृष्णम यांना तत्काळ प्रभावाने सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्याच्या उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.
आचार्य प्रमोद कृष्णम यांनी राम मंदिराबाबत भाजपाला पाठिंबा देऊन खळबळ उडवली होती. त्याशिवाय त्यांनी १९ फेब्रुवारी रोजी संभलमधील कल्की धाम मंदिराचं भूमिपूजन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित केलं होतं. आचार्य प्रमोद कृष्णम हे राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. तसेच गेल्या काही काळापासून ते काँग्रेसच्या अधिकृत धोरणाविरोधात सातत्याने मतप्रदर्शन करत होते.