मॉस्को, दि. 1- मुलांना आत्महत्या करायला प्रवृत्त करणाऱ्या ब्लू व्हेल गेमच्या मास्टरमाईंडला अटक करण्यात आली आहे. ऐकुन सगळ्यांना आश्चर्य वाटेल, पण या गेमच्या मागील मास्टरमाईंड एक 17 वर्षाची रशियन मुलगी आहे. रशियात राहणाऱ्या या 17 वर्षाच्या मुलीवर अनेक मुलांना आत्महत्या करायला प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. ही मुलगी नेमकी कोण आहे ?याबद्दलची माहिती पोलिसांनी अजून उघड केली नाही. डेअली मिररने हे वृत्त दिलं आहे. पोलिसांच्या मते, ही मुलगी खेळाच्या जाळ्यात अडकलेल्या मुलांना तिने दिलेला आदेश ऐकला नाही,तर घरातील इतर व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी देते. या गेममधील पीडित मुलांना ब्लेडच्या सहाय्याने स्वतःवर वार करायला, भितीदायक सिनेमे बघायला तसंच अर्ध्या रात्रीत उठायचे टास्क दिले जातात. गेम खेळणाऱ्या मुलाला नुकसान पोहचविण्याचा या मागील हेतू असतो.
तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेली मुलगी ही सुसाइड गेम ग्रुपची अॅडमीन होती. ब्लू व्हेल गेमच्या जाळ्यात अडकलेल्या मुलांना ती धमक्या द्यायची. तिने मुलांना दिलेला आत्महत्या करण्याता आदेश त्यांनी ऐकला नाही, तर तुमच्या आई-वडील, भाऊ-बहिणीला मारून टाकायची धमकी ती मुलगी द्यायची. रशियाच्या गृह मंत्रालयानुसार, ही मुलगी पीडित मुलाला 50 टक्के टास्क देते, ज्याचा उद्देश मुलांना मानसिक त्रास देण्याचा असायचा. आणि खेळाच्या शेवटच्या टास्कमध्ये त्यांना आत्महत्या करायला लावण्याचा असायचा.
ही मुलगी ‘डेथ ग्रुप अॅडमिनिस्ट्रेटर’ अशीच ओळखली जात आहे, असे रशियाच्या चौकशी यंत्रणेनं म्हटलं आहे. ती स्वत: ब्लू व्हेल चॅलेंज खेळाडू होती. तिने आत्महत्येकडे नेणारं आव्हान पूर्ण केलं नाही. त्याऐवजी ती त्या खेळाची अॅडमिन बनली. या ग्रुपवरील कित्येक डझन सदस्यांना ही मुलगी बहुतेक वेळा जीव जाण्याचीच शक्यता असलेली आव्हाने पाठवायची, अशी माहिती समोर आली आहे.
याआधी या जीवघेण्या 'ब्लू व्हेल चॅलेंज'मागे रशियातील तरूण असल्याची माहिती'ब्ल्यू व्हेल' या खतरनाक गेमचा रशियातील सायबेरिया प्रांतातील एका तरुणानं शोध लावला. फिलिप ब्युडेकिन नावाच्या 22 वर्षीय तरुणानं 'ब्ल्यू व्हेल' चॅलेंजची सुरुवात केली. तरुणांना आत्महत्या करण्यासाठी प्रोत्साहन केल्यामुळे फिलिप गेल्या 3 वर्षांपासून जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. मे महिन्यात फिलिपनं सेंट पीटर्सबर्ग न्यूजला मुलाखत दिली होती. यावेळी जाणूनबुजून तरुणांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले का?, असा प्रश्न मुलाखतीदरम्यान फिलिपला विचारण्यात आला. यावेळी त्यानं ''हो. मी खरंच असेच केले. गोंधळून जाऊ नका तुम्हाला सर्व समजेल. प्रत्येकाला समजले'', अशी धक्कादायक कबुली त्यानं दिली. लोकांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यामागे फिलिपनं निरर्थक व हादरवणारं असं कारण दिलं. त्याचं असं म्हणणं होतं की, ''काही मनुष्य आहेत आणि काही केवळ जैविक कचरा. जी लोकं समाजासाठी कोणत्याही प्रकारे कामी येत नाहीत. जे केवळ समाजाला नुकसान पोहोचवत आहेत किंवा पोहोचवतील. अशा लोकांना आपल्या समाजातून मी मुक्त करत होतो.''