फरीदाबाद : हरियाणामधील काँग्रेसचे प्रवक्ते विकास चौधरी यांच्या हत्येवरून मोठी खळबळ माजली होती. याबाबत फरीदाबाद पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून यामध्ये एक कुख्यात गँगस्टर कौशल याची पत्नी रोशनी आणि दुसरा त्याचा घरगडी नरेश असे आहे.
पोलिसांनुसार कौशलची पत्नी रोशनीच्या सांगण्यावरून नरेशने बंदुका उपलब्ध केल्या होत्या. तसेच कौशलच्या सांगण्यावरूनच रोशनीने हत्येचा कट रचला होता. विकास चौधरी यांच्यावर गोळी चालविणारा सचिन खेडी आणि विकास उर्फ भल्ले यांच्यासह त्यांच्या साथीदारांना लवकरच ताब्यात घेण्यात येणार असल्याचे गुन्हे शाखेचे अधीक्षक अनिल कुमार यांनी सांगितले. आरोपींकडून एसएक्स-4 कारही ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्राथमिक तपासानुसार विकास चौधरी यांची हत्या ही खंडणीतून झाल्याचे समोर येत आहे. रविवारी कौशल गँगचा या हत्येमागे सहभाग असल्याची माहिती मिळाली होती. सूत्रांनुसार क्रिकेट मॅचवर सट्टा लावण्यासाठी एक कोटींची रक्कम न दिल्याने विकास यांची हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी पोलिसांनी तपास सुरू करताच सोशल मिडीयावर कौशल गँगचे नाव व्हायरल झाले होते.
खरेतर गँगस्टर संदीप गाडौलीची ही टोळी होती. मात्र, त्याचा फेब्रुवारी 2016 मध्ये मुंबईत गुरुग्राम पोलिसांसोबतच्या चकमकीत एन्काउन्टर करण्यात आला होता. तेव्हापासून परदेशात आसरा घेतलेला कौशल ही गँग सांभाळत होता. त्याने शहरातील अन्य दोघांकडे खंडणी मागितली होती. मात्र, त्यांनी पैसे दिल्याचे आता समोर येत आहे. तर विकासने पैसे न दिल्याने त्याची हत्या करण्यात आली.