शीलेश शर्मा, नवी दिल्लीकाँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अन्नमंत्री रामविलास पासवान यांना पाठविलेल्या पत्राची दखल घेत अवघ्या काही तासांतच मोदी सरकारने गहू खरेदीसंबंधी गुणवत्तेच्या मानकांत सवलत देण्याची घोषणा केली आहे. तथापि भारतीय अन्न महामंडळाने अहवाल सादर केल्यानंतरच याबाबत निर्णय लागू केला जाईल, अशी अटही घातली आहे.यापूर्वी परिस्थिती पाहून वेळोवेळी अशी सवलत देण्यात आल्याचे अन्न मंत्रालयाने मान्य केले आहे. सोनिया गांधी यांनी पासवानांना पत्र पाठवून ओलसर गहूही खरेदी करण्याची मागणी केली होती. त्यावर पासवान यांनी वरिष्ठ पातळीवर चर्चा करीत तडकाफडकी आदेश दिला. मोदी सरकारवर शेतकरीविरोधी असल्याचा ठपका लागू नये हा त्यामागचा उद्देश असल्याचे मानले जाते. पासवान यांनी लगेच अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करीत गहू खरेदीत सवलत देण्याची घोषणा केली असली तरी कितपत प्रमाणात ओलसर गहू खरेदी केला जाणार ते स्पष्ट केलेले नाही.सोनिया यांनी अवकाळी पावसामुळे फटका बसलेल्या हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब या राज्यांचा दौरा करीत शेतकऱ्यांसाठी लढणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे. १९ एप्रिल रोजीची रॅलीही याच डावपेचाचा भाग असल्याचे सूत्रांनी नमूद केले.
गहू खरेदी मापदंडात सवलत
By admin | Published: April 07, 2015 11:12 PM