लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : ताऱ्यांची निर्मिती करणारी व आजवर अज्ञात असलेली एक नवी आकाशगंगा भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी शोधून काढली आहे. काहीशी अंधुक असलेली ही आकाशगंगा एका मोठ्या व ज्ञात आकाशगंगेमागे दडलेली होती. ही नवी आकाशगंगा पृथ्वीपासून १३.६ कोटी प्रकाशवर्षे इतक्या दूर अंतरावर आहे.
बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर इतर शास्त्रज्ञांच्या मदतीने या नव्या आकाशगंगेचा शोध लावला आहे. एनजीसी ६९०२ए या ज्ञात आकाशगंगेच्या छायाचित्रांचा अभ्यास करताना तिच्या नैर्ऋत्य बाजूस निळ्या रंगाच्या छटा आढळून आल्या. त्यामुळे या आकाशगंगेमागे आणखी एक आकाशगंगा दडलेली असावी, अशी शास्त्रज्ञांना वाटलेली शक्यता सखोल संशोधनानंतर खरी निघाली. या नव्या आकाशगंगेत जन्माला आलेल्या काही ताऱ्यांतून प्रकाशाचे उत्सर्जन झाले होते. त्यामुळेच या आकाशगंगेभोवती निळ्या रंगाची छटा पसरली होती. या आकाशगंगेभोवती असलेल्या अंधाऱ्या आकाशापेक्षाही दहा पट धूसर आहे.
विश्वनिर्मितीची आणखी रहस्ये उजेडात येणारआकाशगंगांच्या शोधातून विश्वाच्या निर्मितीमागची आणखी रहस्ये उजेडात येण्याची शक्यता असते. धूसर आकाशगंगांचे अधिक संशोधन होणे आवश्यक असल्याचे खगोलशास्त्रज्ञांचे मत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील खगोल संशोधन संस्था आपल्या गवसलेल्या गोष्टींच्या माहितीची देवाणघेवाण करत असतात. त्यातून खगोल संशोधनाला दिशा मिळते, असे या शास्त्रज्ञांनी सांगितले.