- सुरेश भटेवारा, नवी दिल्लीपुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये नकारात्मक विचारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मंडळींचे वर्चस्व आहे. बॉलिवूडमधील मान्यवरांच्या मदतीने नवी संस्था स्थापन करून तिला आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनवा, कोट्यवधींचे अनुदान या नव्या संस्थेकडे वळवा, असा सल्ला रा. स्व. संघाने केंद्र सरकारला दिला, मात्र यात तथ्य नाही. हताश मनोवृत्तीतून जन्मलेला हा विचार आहे. केंद्र सरकार तो गांभीर्याने घेईल, असे वाटत नाही. कारण त्यासाठी सरकारला पुण्याची संस्था बंद करावी लागेल. अध्यक्षाच्या ज्या नेमणुकीवरून खरा वाद उद्भवला, त्यांनाही वाऱ्यावर सोडल्यासारखे होईल, असे संकेत केंद्रीय माहिती आणि नभोवाणी मंत्रालयाशी संबंधित विश्वसनीय सूत्रांनी दिले आहेत. समस्येचे मूळ केंद्र सरकार समजावून घेत नाही, तोपर्यंत हा विषय अनिर्णीत राहील, असा धोका जाणवत असल्याचा सूर मात्र संपकरी विद्यार्थ्यांनी आळवला. गजेंद्र चौहान कोणत्याही निकषांवर योग्य नाहीत, असे विद्यार्थ्यांना वाटते. त्यामुळेच तोडगा आजवर निघालेला नाही. २0११च्या बॅचचे विद्यार्थी नेते विकास अर्स म्हणाले, ‘माहिती व नभोवाणी मंत्रालयाच्या ज्या अधिकाऱ्यांकडे संपकऱ्यांशी चर्चा करण्याची सूत्रे आहेत, त्यांना सहानुभूती आहे, तथापि अध्यक्षाच्या नेमणुकीवरील आक्षेपाबाबत बोलण्याचा अधिकार त्यांच्याकडे नाही. पाच बैठका सकारात्मक वातावरणात झाल्या. दुरुस्त्यांबाबत योग्य ती कारवाई करण्याची तयारीही या अधिकाऱ्यांनी दर्शवली आहे. तथापि मूळ विषयाला अद्याप स्पर्श झालेला नसल्यामुळे चर्चा खोळंबली आहे. आम्ही आशा सोडलेली नाही. १0 आॅक्टोबरला सहावी बैठक आहे.’ जुन्या विद्यार्थ्यांना संस्थेतून घालवण्याच्या हालचाली दिल्लीत सुरू झाल्याबरोबर हे विद्यार्थी हादरले. व संपाचे हत्यार उपसले, याबाबत विचारता विद्यार्थ्यांच्या नेत्या व अखेरच्या वर्षाच्या विद्यार्थिनी साक्षी गुलाटी म्हणाल्या, ‘२00७चा एकही विद्यार्थी संस्थेत नाही. इन्स्टिट्यूटमध्ये साधनांची कमतरता आहे, नवे तंत्रज्ञान शिकण्यासाठी व शिकवण्यासाठी वेळ लागतो, २0१४पर्यंत हे तंत्रज्ञान संस्थेत जेमतेम विकसित झाले. अशा विविध कारणांमुळे २00८चे काही विद्यार्थी अद्याप संस्थेत आहेत. विकास अर्स म्हणाले, अभ्यासक्रम व्यापक आहे. ३ वर्षांत संपत नाही. याचा विचार व्यवस्थापनाने केला पाहिजे. मुंबईच्या स्टुडिओत जाऊन विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिकल्स कसे पूर्ण केले, त्याचे तपशील सरकारने समजावून घ्यावेत.राजकारणाशी संबंध नाहीविद्यार्थिनी साक्षी गुलाटी म्हणाल्या, कोणत्या विचारसरणीचा राजकारणावर अधिक प्रभाव आहे, याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही. आग्रह इतकाच की जी कला शिकण्यासाठी आम्ही इथे आलो, त्याचे नेतृत्व या क्षेत्रात गुणवत्ता सिद्ध केलेल्या व्यक्तीकडेच असावे.
फिल्म इन्स्टिट्यूटला पर्यायी संस्था उभारण्याची चर्चा तथ्यहीन
By admin | Published: October 09, 2015 12:54 AM