कोलकात्यातील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात ज्युनिअर डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि त्यानंतर झालेली तिची हत्या, या प्रकरणामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट आहे. या घटनेनंतर पश्चिम बंगालमध्ये डॉक्टर रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. हे आंदोलक डॉक्टर आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची बैठक आता दुसऱ्यांदा फेल झाली आहे. यापूर्वी, पश्चिम बंगाल सरकारने गुरुवारी डॉक्टरांची बैटक बोलावली होती. तेव्हा ममता बॅनर्जी वाट बघत बसल्या मात्र डॉक्टर आले नव्हते.
आंदोलक डॉक्टरांनी शनिवारी पश्चिम बंगाल सरकारला ईमेल पाठवत बैठक बोलावण्याची मागणी केली होती. यानंतर ममता सरकारकडून 6 वाजता बैठक बोलावली होती. यानंतर ज्युनिअर डॉक्टरांचा समूह बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्तानी पोहोचला. मात्र बैठकीचे लाइव्ह स्ट्रीमिंग करण्यावरून बैठक सुरू होऊ शकली नाही. बैठकीचे लाइव्ह स्ट्रीमिंग व्हावे, अशी डॉक्टरांची मागणी आहे. तर प्रकरण न्यायालयात असल्याने बैठकीचे लाइव्ह स्ट्रीमिंग केले जाऊ शकत नाही, ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
"आपण अशा पद्धतीने माझा अपमान करू शकत नाही" - यावेळी, ममता बॅनर्जी यांनी डॉक्टरांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. ममता म्हणाल्या, आम्ही अनेक दिवसांपासून हा गतिरोध संपवण्याचा प्रयत्न करत आहोत, कृपया चर्चा करा. मात्र, डॉक्टर आपल्या मागणीवर ठाम राहिले. तेव्हा ममता म्हणाल्या, आपण अशा पद्दतीने माझा अपमान करू शकत नाही.