शीलेश शर्र्मा
नवी दिल्ली : काँग्रेस महाराष्ट्रासह पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. या निवडणुकांची रणनीती ठरविण्यासाठी काँग्रेसच्या सरचिटणीसांची बैठक बोलाविण्यात येणार आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते ए. के. अॅन्टोनी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत विधानसभेच्या आगामी निवडणुकांची तयारी आणि पक्ष मजबूत करण्यावर चर्चा करण्यात आली. राहुल गांधी हेच यापुढेही काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असतील, असा निर्णयही याच बैठकीत घेण्यात आला.लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूक होणाºया राज्यांतील प्रदेशाध्यक्ष बदलावेत की नाही, या मुद्यांवर काँग्रेस सरचिटणीसांच्या बैठकीनंतर निर्णय होईल, असे संकेत आहेत. बैठकीनंतर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, ही बैठक अनौपचारिक होती. या बैठकीला अहमद पटेल, पी. चिदंबरम, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खरगे, जयराम रमेश, के. सी. वेणुगोपाल आणि आनंद शर्मा यांच्यासह अन्य वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीला राहुल गांधी यांची उपस्थिती नव्हती.
राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि यापुढेही अध्यक्ष असतील, यात कोणतीही शंका नाही. तेव्हा अन्य पर्यायावर विचार करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. लोकसभा आणि राज्यसभेतील काँग्रेसच्या नेत्यांबाबत संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी निर्णय घेतील, असेही सुरजेवाला यांनी स्पष्ट केले. महाराष्टÑातील विधानसभा निवडणुकीबाबत काँग्रेस अत्यंत गंभीर आहे. काँग्रेस महाराष्टÑात राष्टÑवादी काँग्रेससोबत निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहे. महाराष्टÑाचे प्रभारी खरगे हे आतापासूनच निवडणूक रणनीती आखण्यास लागले आहेत. काँग्रेस सरचिटणीसांच्या बैठकीत या रणनीतीबाबत ते माहिती देण्याची शक्यता आहे. महाराष्टÑासह हरियाणा, झारखंड, दिल्ली आणि जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेसाठी निवडणूक होणार आहे.