सुरेश भटेवरा,नवी दिल्ली- राज्यसभेत वस्तू व सेवा कर (जीएसटी) विधेयकावर बुधवारी चर्चा सुरू झाली. अर्थमंत्री अरुण जेटलींनी थोडक्यात प्रस्तावना केल्यानंतर काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मांनी चर्चेला प्रारंभ केला. बुधवारी ४ तास व गुरूवारी ४ तास अशी एकूण ८ तास चर्चा दोन दिवस चालणार आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांत विविध विधेयकांच्या चर्चेमुळे गेला आठवडा फारच घाईगर्दीचा गेला. दोन्ही सभागृहात वित्त विधेयक, मानसिक आरोग्य विधेयक आदींवर सायंकाळी उशिरापर्यंत चर्चा झाली. वस्तू व सेवा कर विधेयक लोकसभेत ३0 मार्च रोजीच मंजूर झाले आहे.सरकारने राज्यसभेचे अवमूल्यन चालवले आहे, असा आरोप काँग्रेससह अन्य विरोधकांनी लोकसभेत चर्चेच्या दरम्यान केला. सरकारने ही बाब गांभीर्याने घेतली असून राज्यसभेत विरोधकांचे तमाम आक्षेप ऐकण्याची तयारी सरकारने ठेवली आहे. वस्तू व सेवा कर विधेयकात दुरुस्त्या सुचवून विरोधकांनी मतविभाजनाची मागणी करू नये, याबाबत मात्र सरकार विशेष सतर्क आहे. भाजप आणि सरकारच्या सहयोगी पक्षांनी सदस्यांना व्हिप जारी केला आहे. वित्त विधेयकाला विरोधी पक्षांनी दिलेल्या दुरुस्त्या राज्यसभेत मंजूर झाल्या. त्यामुळे सरकारला मोठा झटका बसला होता. आर्थिक सुधारणांचे क्रांतीकारी विधेयक असलेल्या वस्तू व सेवा कराबाबत तसे होऊ नये, यासाठी सरकारने विशेष काळजी घेतली आहे.
राज्यसभेत जीएसटीवर चर्चा
By admin | Published: April 06, 2017 4:32 AM