राज्यसभेतील चर्चा; ध्येय काँग्रेस मुक्तीचे, भाषण मात्र काँग्रेसयुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 12:58 PM2022-02-09T12:58:39+5:302022-02-09T13:06:10+5:30
नववर्षात संसदेच्या पहिल्या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने होते. यात सरकारने गेल्या वर्षात केलेल्या व पुढील आर्थिक वर्षात करावयाच्या धोरणाचा मसुदा सादर केला जातो. राष्ट्रपतींचे भाषण प्रामुख्याने सरकारची भूमिका असते.
सुरेश भुसारी -
नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या संसदेतील अभिभाषणावर विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना बगल देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रामुख्याने काँग्रेसला लक्ष्य करण्याचा शिरस्ता मंगळवारीही राज्यसभेत कायम राखला.
नववर्षात संसदेच्या पहिल्या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने होते. यात सरकारने गेल्या वर्षात केलेल्या व पुढील आर्थिक वर्षात करावयाच्या धोरणाचा मसुदा सादर केला जातो. राष्ट्रपतींचे भाषण प्रामुख्याने सरकारची भूमिका असते. राष्ट्रपतींनी मांडलेल्या मुद्यांना केंद्रातील सरकार कसे पुढे नेणार आहे, याची ब्ल्यू प्रिंट ते देतील, अशी अपेक्षा असते. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सत्ताधारी व विरोधकांनी विविध मुद्दे उपस्थित केले. विरोधकांनी केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली. या अभिभाषणाच्या चर्चेला पंतप्रधान उत्तर देतात व विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना पंतप्रधान उत्तर देतील, असा कयास असताना पंतप्रधान मोदी यांनी दोन्ही दिवस सरकारच्या कामगिरीचा फारसा उल्लेख न करता काँग्रेसवर तोंडसुख घेण्यात धन्यता मानल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्रातून मजुरांना बिहार व उत्तर प्रदेशमध्ये गावाला जाण्यासाठी काँग्रेस व आम आदमी पार्टीच्या हेतूंवर थेट संशय घेतला. याउलट मोदी सरकारनेच मजुरांना गावाला जाण्यासाठी मुंबईसह विविध महानगरांतून श्रमिक एक्स्प्रेस सुरू केल्या होत्या, याचा पंतप्रधानांना बोलण्याच्या ओघात विसर पडल्याचे स्पष्ट झाले. तीव्र प्रतिक्रिया लोकसभेत केलेल्या भाषणावर महाविकास आघाडी नेत्यांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर मंगळवारी राज्यसभेतील भाषणांमध्ये या मुद्याचा उल्लेख केला नाही; परंतु देश काँग्रेसमुक्त करण्याची वारंवार भलावण करणाऱ्या पंतप्रधानांचे भाषण दोन्ही दिवस काँग्रेसमुक्त राहू शकले नाही.