युद्ध नव्हे, चर्चा हाच एकमेव मार्ग; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतीन यांना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 07:05 AM2022-12-17T07:05:19+5:302022-12-17T07:05:55+5:30
जी-२० गटाचे अध्यक्षपद कार्यकाळात भारत कोणती कामे हाती घेणार आहे, याची माहिती मोदी यांनी पुतीन यांना दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : युक्रेन संघर्षाचा प्रश्न सोडविण्यासाठी राजनैतिक पातळीवर चर्चा करून तोडगा काढणे हाच एकमेव मार्ग आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना सांगितले. या दोन्ही नेत्यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली. भारत व रशियामध्ये ऊर्जा, व्यापार, संरक्षण या क्षेत्रांमध्ये आणखी सहकार्य वाढविण्यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले.
या चर्चेत पुतीन यांनी युक्रेनसंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली. जी-२० गटाचे अध्यक्षपद कार्यकाळात भारत कोणती कामे हाती घेणार आहे, याची माहिती मोदी यांनी पुतीन यांना दिली. शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनची समरकंद शहरात १६ सप्टेंबर रोजी परिषद भरली होती. त्यावेळी मोदी व पुतीन यांची प्रत्यक्ष भेट झाली होती. सध्याचे युग युद्धाचे नाही, असे मोदी यांनी पुतीन यांना याआधीही सांगितले होते. (वृत्तसंस्था)
युक्रेनवर रशियाचा ६० क्षेपणास्त्रांचा मारा
रशियाने युक्रेनमध्ये शुक्रवारी सुमारे ६० क्षेपणास्त्रांचा मारा केला. त्यामुळे युक्रेनच्या चार शहरांमध्ये विविध ठिकाणी स्फोट झाले व काही इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. तेथील एका शहरात निवासी इमारतीवर झालेल्या हल्ल्यात दोघे मरण पावले. क्षेपणास्त्रांच्या माऱ्यामुळे खारकीव शहरात वीज व पाणीपुरवठा बंद पडला आहे. हजारो नागरिकांनी रेल्वे स्थानकांमध्ये आश्रय घेतला.
रशियाने युक्रेनवर गेल्या १० महिन्यांतील सर्वात मोठा क्षेपणास्त्र हल्ला शुक्रवारी केला. या क्षेपणास्त्रांपैकी ३७ क्षेपणास्त्रे पाडण्यात युक्रेनच्या लष्कराला यश आले. कीव्ह, क्रिवी रिह, झापोरिझ्झिया, खारकीव या चार शहरांना रशियाने लक्ष्य केले होते.