शरद पवारांच्या खासदारांशी संपर्काची चर्चा: अजित पवार दिल्लीत दाखल; नेमकं काय घडतंय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 20:00 IST2025-01-08T19:59:53+5:302025-01-08T20:00:38+5:30
अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे.

शरद पवारांच्या खासदारांशी संपर्काची चर्चा: अजित पवार दिल्लीत दाखल; नेमकं काय घडतंय?
Ajit Pawar: राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज दुपारनंतर दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीत पोहोचल्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी भेट दिली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा रंगत असतानाच अजित पवारांच्या या दिल्ली दौऱ्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क बांधले जाऊ लागले आहेत.
सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांना वगळून इतर खासदारांनी आमच्यासोबत यावं, असं आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केल्याची चर्चा रंगत आहे. याबाबत अद्याप अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून अधिकृत भाष्य करण्यात आलं नसलं तर सोनिया दुहान यांनी आमच्यातील काही खासदारांना संपर्क केल्याची माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमर काळे यांनी दिली आहे. अमर काळे यांनी सांगितलं की, "आम्ही अजित पवार गटात प्रवेश करावा यासाठी सोनिया दुहान यांनी आमच्याशी संपर्क साधला होता. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता विकासकामं करायची असतील तर एनडीएसोबत जाण्याशिवाय पर्याय नाही, असा सल्ला त्यांनी दिला होता, असे अमर काळे यांनी सांगितले. तसेच माझ्याशीच नाही तर निलेश लंके, भास्कर भगरे, धैर्यशील मोहिते पाटील, बजरंग सोनावणे यांच्याशीही त्यांनी संपर्क साधला होता," असा दावा अमर काळे यांनी केला.
अजित पवारांचा दौरा कशासाठी?
महाराष्ट्रात सत्तास्थापन होऊन मंत्रिमंडळ विस्तारही झाला असला तरी मागील काही दिवसांपासून अजित पवारांच्या दिल्लीवाऱ्या वाढल्याचं दिसत आहे. अधिवेशन काळातही ते काही दिवस गायब होते. त्यामुळे पडद्याआड नेमक्या काय हालचाली सुरू आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, अजित पवार यांचा आजचा दिल्ली दौरा नेमका कशासाठी होता आणि ते या दौऱ्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्याही भेटीगाठी घेतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.