नवी दिल्ली: देशाच्या प्रगतीसाठी 'वन नेशन, वन इलेक्शन'ची गरज असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. आज मोदींनी अखिल भारतीय पीठासीन अधिकाऱ्यांच्या संमेलनाला संबोधित करताना मोदींनी 'वन नेशन, वन इलेक्शन'बद्दल गांभीर्यानं विचारमंथन आवश्यक असल्याचं म्हटलं. संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर मोदींनी पीठासीन अधिकाऱ्यांशी संवाद साधला.'वन नेशन, वन इलेक्शन' केवळ विचारमंथनाचा विषय नाही. ही देशाची गरज आहे. आता आपल्याकडे काही महिन्यांनी देशात कुठे ना कुठे निवडणूक होत असतात. त्यामुळे विकासकामांमध्ये अडथळा येतो. देशाच्या प्रगतीचा वेग मंदावतो. याबद्दल आपण गांभीर्यानं विचार करायला हवा, असं मत मोदींनी मांडलं. लोकसभा, विधानसभा आणि अन्य निवडणुकांसाठी केवळ एका मतदारयादीचा वापर व्हायला हवा. आपण या मतदारयाद्यांवर पैसा आणि वेळ का खर्च करतोय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
देशाला 'वन नेशन, वन इलेक्शन'ची गरज; त्यावर गंभीर चर्चा आवश्यक- पंतप्रधान मोदी
By कुणाल गवाणकर | Published: November 26, 2020 3:37 PM