नवी दिल्ली : पश्चिम आशियात सक्रिय इस्लामिक स्टेटस् आॅफ इराक अॅण्ड सिरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेच्या सोशल मीडियावरील प्रचारास भारतीय नागरिक बळी पडत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी शनिवारी एक उच्चस्तरीय बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच केंद्र आणि राज्यातील सुरक्षा यंत्रणेला अतिसतर्क राहण्याचे निर्देशही गृहमंत्र्यांनी यावेळी दिले.या बैठकीला गृहमंत्रालय, केंद्रीय गुप्तचर संस्था आणि सुरक्षा संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १३ राज्यांचे पोलीस प्रमुख उपस्थित होते.अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इसिसद्वारे सोशल मीडियाच्या माध्यमाने भारतीय तरुणांना आकर्षित करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर बैठकीत विचारविनिमय झाला. तसेच शेजारील देशात या संघटनेच्या वाढत्या प्रभावापासून भारतीय तरुणांचा बचाव करण्याकरिता सुरक्षा संस्थांनी नवे डावपेच आखले पाहिजे अशी गरज व्यक्त करण्यात आली. त्याअनुषंगाने अल्पसंख्यक समुदायातील लोकांच्या विकासासाठी चांगल्या योजना, त्यांना इसिसच्या प्रभावातून वाचविण्याकरिता ठोस उपाय आणि पोलीस विभागाला माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अधिक कार्यक्षम बनविण्याबाबतच्या सूचना समोर आल्या. राजनाथसिंह यांनी बैठकीला मार्गदर्शन करताना सांगितले की, भारतीय परंपरा आणि कौटुंबिक संस्काराच्या आधारे या धोक्याचा सामना केला जाऊ शकतो. शेजारील देशांच्या तुलनेत भारतात इसिसचा अत्यल्प अथवा नाहीच्या बरोबरीत प्रभाव आहे. परंतु तरीही चौफेर सतर्क राहण्याची गरज आहे. भारतातील बहुतांश मुस्लीम संघटनांनी इसिस आणि तिच्या दहशतवादी विचारसरणीला विरोध केला आहे याबद्दल गृहमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. बैठकीला महाराष्ट्रासह विविध राज्यांचे पोलीस प्रमुख उपस्थित होते. (वृत्तसंस्था)
इसिसला थोपविण्यासाठी डावपेचांवर चर्चा
By admin | Published: January 17, 2016 1:38 AM