हरीष गुप्ता
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : वादग्रस्त मुद्द्यांवर एकमताने लोकसभा चालवण्याची शक्यता १८ व्या लोकसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बुधवारी मावळली. सत्ताधारी एनडीए आणि इंडिया आघाडी हे अध्यक्षपदाच्या नावावर एकमत घडवण्यात अपयशी ठरल्याचे यापूर्वीच समोर आले होते. उपाध्यक्षपद विरोधकांना देणार नसल्याचे एनडीएने सांगितले होते. मात्र, त्यावरून कटूता निर्माण झाली नाही. विरोधकांनी लोकसभेत मतांच्या विभाजनासाठी दबाव आणला नाही आणि आवाजी मतदानाने ओम बिर्ला यांची निवड स्वीकारली तेव्हाही सहमती दिसून आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तर हस्तांदोलन केले आणि ओम बिर्ला यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांना एकत्रितपणे खुर्चीपर्यंत नेले. राहुल गांधी यांनी बिर्ला यांचे अभिनंदन केले. तसेच, विरोधकांचा आवाज ऐकला जाईल अशी आशा व्यक्त केली. पंतप्रधानांनी हुकूमशाहीच्या धोक्यांबद्दल शिक्षित करण्याचे महत्त्व सांगितले. याने सत्ताधारी-विरोधकात एकवाक्यता राहणार नाही, याचे संकेत मिळाले व संघर्षाची रेषा आखली गेली.
जोरदार घोषणाबाजी- तत्कालीन पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी २५-२६ जून १९७५ रोजी लागू केलेल्या आणीबाणीचा निषेध करणारा ठराव सभागृहात मांडण्यास ओम बिर्ला यांना भाग पाडून सत्ताधारी पक्षाने सर्वांनाच चकित केले.- हा विषय दिवसाच्या कार्यक्रमपत्रिकेचा भाग नसल्यामुळे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी खासदारांमध्ये जोरदार घोषणाबाजी सुरू झाली.
अपेक्षा पूर्ण करण्यात तुमची मोठी भूमिका
- तुम्ही दुसऱ्यांदा या आसनावर बसलात, हे या सभागृहाचे सौभाग्य आहे. अठराव्या लोकसभेत दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणे हा एक नवा विक्रम आहे.
- तुमचे आणि संपूर्ण सभागृहाचे माझे अभिनंदन आणि शुभेच्छा. येत्या पाच वर्षांत तुम्ही आम्हाला मार्गदर्शन कराल आणि देशाच्या आशा-आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करण्यात तुमची मोठी भूमिका असेल, असा आम्हाला विश्वास आहे.
- तुमचे स्मितहास्य संपूर्ण सभागृहाचे वातावरण प्रसन्न ठेवते. मला विश्वास आहे की, तुम्ही प्रत्येक पावलावर नवीन आदर्श निर्माण कराल. लोकसभेत आणीबाणीचा निषेध केल्याबद्दल आपले अभिनंदन, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओम बिर्ला यांचे कौतुक करताना म्हटले.
विरोधकांचा आवाज दबणार नाही, ही अपेक्षा
- हे सभागृह भारतातील लोकांच्या आवाजाचे प्रतिनिधित्व करते आणि तुम्ही त्याचे संरक्षक आहात. निःसंशयपणे, सरकारकडे राजकीय शक्ती आहे; पण विरोधी पक्ष देखील भारतातील लोकांच्या आवाजाचे प्रतिनिधित्व करतो.
- सभागृह चालवण्यासाठी विरोधी पक्ष पूर्ण सहकार्य करतील; मात्र विरोधकांना सभागृहात जनतेचा आवाज उठवण्याची संधी मिळणेही महत्त्वाचे आहे. विरोधकांचा आवाज सभागृहात बुलंद व्हायला हवा.
- सभागृह किती कार्यक्षमतेने चालते हा प्रश्न नसून, सभागृहात भारताचा आवाज किती ऐकला जातो हा प्रश्न आहे. त्यामुळे विरोधकांचा आवाज बंद करून तुम्ही सभागृह कार्यक्षमतेने चालवू शकता, ही कल्पनाच लोकशाहीविरोधी आहे, असे विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले.
संसदीय परंपरेनुसार सर्व सदस्यांनी एकत्रितपणे राष्ट्रहितासाठी काम केले पाहिजे. रस्त्यावर आणि संसदेतील निषेध यांतील फरक समजून घेतला पाहिजे. संसदेच्या प्रतिष्ठेला अनुसरून निषेधाची पद्धत स्वीकारा. व्यत्यय हा लोकसभेच्या परंपरेचा भाग नाही आणि आशा आहे की, भविष्यात कोणतीही सक्तीची कारवाई करावी लागणार नाही. - ओम बिर्ला, अध्यक्ष, लोकसभा.
तुम्ही ज्या पदावर आहात, त्याच्याशी अतिशय गौरवशाली परंपरा निगडित आहे. तुुम्ही भेदभाव न करता पुढे जाल आणि लोकसभाध्यक्ष या नात्याने प्रत्येक खासदार आणि प्रत्येक पक्षाला समान संधी द्याल, असा विश्वास आहे. कोणत्याही लोकप्रतिनिधीचा आवाज दडपला जाऊ नये किंवा हकालपट्टीसारखी कृती होऊन पुन्हा सभागृहाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचू नये, अशी आपणा सर्वांची अपेक्षा आहे. - अखिलेश यादव, अध्यक्ष, खासदार, समाजवादी पक्ष
आता सत्ताधारी भाजप वर्चस्व गाजवण्यास सक्षम राहणार नाही. ओम बिर्ला यांची सलग दुसऱ्यांदा लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. छोट्या पक्षांनाही सभागृहात पुरेशी संधी मिळायला हवी. - असदुद्दीन ओवैसी, अध्यक्ष, खासदार, एमआयएम
तुम्ही १५० सदस्यांना निलंबित केल्याने खूप वाईट वाटले. आता विनंती आहे की, निलंबनाची कारवाई करू नका. संवादातूनही गोष्टी सोडवता येतात. - सुप्रिया सुळे, खासदार, शरद पवार गट