चंडीगड : शेतकऱ्यांनी मांडलेल्या विविध मागण्यांवर तसेच पिकांसाठी किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) कायदेशीर हमी समाविष्ट असलेला शेतकरी नेते आणि केंद्रीय शिष्टमंडळ यांच्यातील चर्चेचा सातवा टप्पा कोणताही तोडगा न निघताच बुधवारी संपला. पुढील बैठक ४ मे रोजी होणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी त्यावेळी केली. बैठकीनंतर चौहान म्हणाले, “सौहार्दपूर्ण वातावरणात सकारात्मक चर्चा झाली. चर्चा सुरूच राहतील.
बुधवारी सकाळी ११.५० वाजता बैठकीसाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल सेक्टर-२६ येथील महात्मा गांधी सार्वजनिक प्रशासन संस्थेत पोहोचले. पंजाबचे अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा आणि कृषिमंत्री गुरमीत सिंग खुदियान हे देखील बैठकीला उपस्थित होते. ही बैठक चार तास चालली. चर्चेपूर्वी, शेतकरी नेते सर्वन सिंग पंधेर यांनी सांगितले होते की, संयुक्त किसान मोर्चा (गैरराजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाचे २८ सदस्यीय शिष्टमंडळ बैठकीत सहभागी होईल. आम्हाला आशा आहे की एमएसपी हमी कायद्यावरील विरोध संपेल आणि चर्चा पुढे जाईल. तत्पूर्वी, जगजीत सिंग डल्लेवाल आणि सर्वन सिंग पंधेर यांच्यासह शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ बैठकीच्या ठिकाणी पोहोचले होते.
पंजाब पोलिसांनी बैठकीनंतर शेतकरी नेत्यांना घेतले ताब्यात पंजाब पोलिसांनी बुधवारी मोहालीमध्ये सर्वन सिंग पंधेर आणि जगजित सिंग डल्लेवाल यांच्यासह अनेक शेतकरी नेत्यांना ताब्यात घेतले. केंद्रीय शिष्टमंडळाबरोबरच्या बैठकीनंतर ते शंभू आणि खानौरी येथील आंदोलन स्थळांकडे जात होते. शेतकरी नेते गुरमनीत सिंग मंगत यांनी हा दावा केला.