कोरोना विरुद्धच्या लढ्यात भारताच्या ताफ्यात आता आणखी एक लस उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न नीति आयोगाकडून केला जात आहे. 'जॉन्सन अँड जॉन्सन' कंपनीनं विकसीत केलेल्या सिंगल डोस लसीबाबत कंपनीसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती नीति आयोगाच्या आरोग्य विभागाचे सदस्य डॉ. व्ही.के.पॉल यांनी दिली आहे. ते दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
"जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीसोबत चर्चा सुरू असून त्यांनी विकसीत केलेल्या सिंगल डोस लसीची माहिती घेण्याचं काम सुरू आहे. नियोजित योजनेनुसार या लसीची निर्मिती देखील हैदराबादमध्ये 'बायो ई'कडून केली जाण्याची शक्यता आहे", असं डॉ. व्ही.के.पॉल म्हणाले.
जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीनं कोरोना विरोधी विकसीत केलेल्या लसीचा केवळ एकच डोस घ्यावा लागतो. त्यामुळे या लसीला परवानगी मिळाल्यात देशातील कोरोना लसीकरणाला आणखी वेग येण्याची शक्यता आहे. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या लसीमुळे नागरिकांना लसीचे दोन डोस घेण्याचा त्रास आणि वेळ वाचणार आहे.
दरम्यान, देशातील १२ राज्यांमध्ये डेल्टा प्लसचे एकूण ५६ रुग्ण असल्याची माहिती देखील यावेळी डॉ. पॉल यांनी दिली. असं असलं तरी देशात गेल्या आठवड्यात कोरोना रुग्णांचं प्रमाणात १३ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. सध्या देशात दैनंदिन पातळीवर सरासरी ४६ हजार नव्या रुग्णांची भर पडत आहे. पण कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे ही अतिशय चांगली गोष्ट असल्याचं आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं.
लसीकरणात भारताची मुसंडी, अमेरिकेला टाकलं मागेअनेक अडथळ्यांचा संकटांचा सामना करत भारतामध्ये कोरोनाविरोधातील लसीकरणाची व्यापक मोहीम सुरू आहे. दरम्यान, या मोहिमेमध्ये आतापर्यंत देशातील ३४ कोटींहून अधिक नागरिकांना कोरोनाविरोधातील लस देण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील १८ ते ४४ वयोगटामधील सुमारे ९ कोटी ४१ लाख ३ हजार ९८५ जणांना कोरोनावरील लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर या वयोगटातील २२ लाख ७३ हजार ४७७ लोकांनी कोरोनावरील लसीचा दुसरा डोसही घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, शुक्रवारी सकाळी ७ वाजेपर्यंत मिळालेल्या अहवालानुसार ३४ कोटी ७६ हजार २३२ लोकांना कोरोनावरील लस देण्यात आली आहे. तर सुमारे ४२ लाख लोकांना गेल्या २४ तासांत लस देण्यात आली आहे.
ग्लोबल व्हॅक्सिन ट्रॅकरच्या ताजा आकडेवारीनुसार भारतामध्ये आतापर्यंत ३४ कोटी लोकांना कोरोनावरील लसीचा डोस मिळाला आहे. तर अमेरिकेमध्ये ३२ कोटी ३३ लाख २७ हजार ३२८ लोकांचे लसीकरण झाले आहे. याआधारावर लसीकरणाच्या बाबतीत भारताने अमेरिकेला मागे टाकले आहे. कोरोना लसीकरणामध्ये तिसऱ्या क्रमांकावर यूके आहे. येथे आतापर्यंत ७ कोटी ६७ लाख ७४ हजार ९९० जणांचे लसीकरण झाले आहे. तर चौथ्या क्रमांकावर असलेल्या जर्मनीमध्ये ७ कोटी १४ लाख ३७ हजार ५१४ जणांचे लसीकरण झाले आहे.