संजय शर्मा -नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यात शुक्रवारी संसद भवनात प्रदीर्घ काळ झालेल्या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांच्या बदलांबाबत चर्चा झाली.नड्डा यांचा अध्यक्षीय कार्यकाळ वाढल्यानंतरच त्यांनी आपल्या नवीन टीमची बांधणी सुरू केली आहे. राज्यांमध्येही संघटनात्मक फेरबदल केले जाणार आहेत.अमित शहा यांची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांच्याशीही चर्चा होत आहे. छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना थेट टक्कर देईल, असा भाजपकडे माजी मुख्यमंत्री डॉ.रमण सिंह यांच्यानंतर कोणताही मोठा नेता नाही. नड्डा आपल्या दौऱ्यात छत्तीसगडमधील निवडणुकीच्या भाजपच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रीय स्तरावर काही नेत्यांची नियुक्ती होणार आहे. भाजप खा.विजय बघेल यांना केंद्रात मंत्री केले जाण्याची शक्यता आहे.राजस्थानमध्ये भाजपची निवडणुकीची तयारी अद्याप व्हायची आहे. वसुंधरा राजे यांच्याबाबत भाजप पक्षनेतृत्व कोणता निर्णय घेते, याकडे भाजप नेत्यांचे लक्ष लागले आहे.
बदलांचे महत्त्व- संघटन व सरकारमध्ये होणाऱ्या बदलांची प्रतीक्षा वाढत आहे. आधी जानेवारी महिन्यात फेरबदल करण्याची शक्यता वर्तविली जात होती. आता संसद अधिवेशनाचा पहिला टप्पा समाप्त होताच, पुन्हा एकदा सत्ता, संघटनेत फेरबदल व बदलांची शक्यता वर्तविली जात आहे. - हा बदल महत्त्वाचा मानला जात आहे. कारण हाच बदल २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप असेल, तसेच या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठीही हा बदल महत्त्वपूर्ण असेल.