चंद्रशेखर बर्वे
नवी दिल्ली : सरकारने संसदेच्या हिवाळी अधिवेशनात संविधानावर चर्चा करण्याची तयारी दर्शविल्यामुळे विरोधी पक्षांनी आपली तलवार आज म्यान केली. पुढील आठवड्यात लोकसभा आणि राज्यसभेत संविधानावर चर्चा होणार आहे.
संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी पत्रकारांना सांगितले की, लोकसभेत १३ आणि १४ डिसेंबर, तर राज्यसभेत १६ आणि १७ डिसेंबर रोजी संविधानावर चर्चा केली जाणार आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सोमवारी सर्वपक्षीय बैठक बोलाविली होती. यात सरकारने संविधानावर चर्चा करण्याचा प्रस्ताव मांडला आणि विरोधी पक्षांनी त्याला संमती दर्शविली.
तृणमूलची वेगळी वाट
अदानी मुद्यावर विरोधकांत एकमत नसल्याचे दिसले. तृणमूल काँग्रेसने या मुद्यावरून सोबत नसल्याचा संदेश देत ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीला दांडी मारली.