भागलपूर (बिहार) : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीवर हल्लाबोल करीत समाजात फूट पाडणाऱ्या आणि खोटी आश्वासने देणाऱ्या लोकांना धुडकावून लावण्याचे आवाहन शनिवारी येथे केले. तसेच आरक्षणाच्या मुद्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपात मॅचफिक्सिंग असल्याचा आरोपही त्यांनी केला.बिहार विधानसभा निवडणुकीसाठी कहलगाव येथून काँग्रेस अध्यक्षांनी पक्षाच्या प्रचारास प्रारंभ केला. यावेळी आरक्षणावरून भाजपावर थेट लक्ष्य साधताना आपला पक्ष अनुसूचित जाती, जनजाती आणि गरिबांसाठी आरक्षणाच्या संवैधानिक धोरणाप्रति वचनबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. बिहार विधानसभा निवडणुका निर्णायक असून राज्यासोबतच देशाच्या भविष्यावरही याचा परिणाम होणार आहे. मोदी बिहारवासीयांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप करताना सोनिया म्हणाल्या की, त्यांनी जाहीर केलेले पॅकेज वास्तवापासून फार दूर आहे. पॅकेजचे सत्य काय आहे? कारण पंतप्रधान पॅकेजिंग आणि रिपॅकेजिंगचे तज्ज्ञ आहेत. त्यांनी जुन्या योजना नव्या रूपात सादर केल्या. (वृत्तसंस्था)टीका करताना काय म्हणाल्या काँग्रेस अध्यक्षा...मोदी यांना सतत परदेशात राहण्यास आवडते. परदेशात गेले की ते तेथील प्रसिद्ध लोकांना अलिंगन देतात. परंतु आपल्या देशातील गरीब जनतेसाठी मात्र त्यांच्याकडे वेळ नाही. त्यांनी विदेश दौरे अवश्य करावेत. पण ज्या लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकला त्यांच्यासोबत राजकारण करू नये. २०१४ साली भाजपा नेते शाहनवाज हुसेन यांचा भागलपूरमधून पराभव झाला होता. यावरून येथील जनतेचा धर्मनिरपेक्षतेवर विश्वास असल्याचे यावरून स्पष्ट होते.मोदींचा १५ महिन्यांचा कार्यकाळ अत्यंत धोकादायक राहिला. काही कॉर्पोरेटशिवाय कुणाचाही फायदा त्यांनी बघितला नाही.
समाजात फूट पाडणाऱ्यांना धुडकावून लावा - सोनिया गांधी
By admin | Published: October 04, 2015 12:24 AM