नवी दिल्ली - TMC MP Kalyan Banerjee mimicry ( Marathi News ) संसदेचे हिवाळी अधिवेशन सध्या दिल्लीत सुरू आहे. मात्र १४१ खासदारांच्या निलंबनानंतर दिल्लीत राजकीय वातावरण तापलं आहे. मंगळवारी संसदेत निलंबित केलेले टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांची नक्कल केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यावरून सत्ताधारी भाजपाने विरोधकांना घेरले आहे. त्यात आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षाच्या खासदाराच्या कृत्याचा निषेध केला आहे.
संसदेत उपराष्ट्रपतींचा अपमान चुकीचा आहे असं राष्ट्रपतींनी म्हटलं तर मंगळवारी सभागृहात सभापतींनीही नाराजी व्यक्त केली. पंतप्रधान मोदींनीही विरोधी खासदाराच्या या कृत्यावर आक्षेप घेतला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, संसदेच्या परिसरात उपराष्ट्रपतींचा ज्याप्रकारे अपमान झाला ते पाहून मला खूप वाईट वाटले. निवडून आलेले प्रतिनिधींना स्वत:ला अभिव्यक्त करण्यास स्वतंत्र असले पाहिजेत, परंतु त्यांची अभिव्यक्ती सन्मान आणि सौजन्याच्या निकषांमध्ये असावी. हीच संसदीय परंपरा आहे ज्याचा आम्हाला अभिमान आहे आणि भारतातील लोक ते कायम राखतील अशी अपेक्षा आहे असं त्यांनी एक्सवर सांगितले.
तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जगदीप धनखड यांना फोन करून खेद व्यक्त केला.मागील २० वर्षापासून माझाही असाच अपमान मी पाहत आलोय. परंतु देशाचे उपराष्ट्रपती पदासारख्या घटनात्मक पदावर बसलेले असताना आणि तेदेखील संसद भवनात असे कृत्य होणं दुर्दैवी आहे असं मोदींनी म्हटलं. त्यावर काही लोकांच्या अशा प्रकारामुळे मला माझे कर्तव्य निभावण्यापासून आणि आपल्या संविधानाचे रक्षण करण्यापासून कुणी रोखू शकत नाही. मी संविधानाच्या मूल्यांवर चालण्यास कटिबद्ध आहे. त्यामुळे हे अपमान मला माझ्या मार्गापासून चालण्यास विचलित करू शकत नाहीत असं धनखड यांनी पंतप्रधानांना म्हटलं.
मंगळवारी संसदेच्या खासदारांनी निलंबनावरून एकत्र येत संसद भवनात आंदोलन केले. यावेळी श्रीरामपूरचे टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभा सभापती आणि उपराष्ट्रपती धनखड यांची मिमिक्री केली. त्यांच्या मिमिक्रीनं तिथे उपस्थित खासदारांमध्ये हास्यकल्लोळ सुरू होता. तर काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी या घटनेचा व्हिडिओ बनवत होते. विरोधकांच्या या प्रकारावर भाजपाने जोरदार हल्ला केला. घटनात्मक पदावर बसलेल्या कुठल्याही व्यक्तीचा अपमान सहन केला जाऊ शकत नाही असं म्हटलं आहे.