योगी सरकार बरखास्त करा, ‘हाथरस’वर भाजप गप्प का?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2020 06:18 AM2020-10-02T06:18:46+5:302020-10-02T06:18:55+5:30
काँग्रेसची जोरदार निदर्शने; राज्यभर ठिकठिकाणी पडसाद, विविध संघटनांकडून निषेध
मुंबई : उत्तर प्रदेशातील हाथरस येथील अत्याचाराच्या घटनेचे तीव्र पडसाद राज्यात ठिकठिकाणी उमटले. प्रदेश काँग्रेसने मुंबईत निदर्शने करून योगी आदित्यनाथ यांचे सरकार बरखास्त करण्याची मागणी केली.
हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी निघालेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना रस्त्यात अडवून उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की केली. या घटनेच्या निषेधार्थ प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी मुंबईत महात्मा गांधी यांच्या पुतळयासमोर निदर्शने के ली. छोट्या छोट्या गोष्टीत सतत टिवटिव करणाऱ्या भाजप नेत्यांनी आता उत्तर प्रदेशच्या या घटनेवर मौन का बाळगले आहे? महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांना ही दुर्दैवी घटना मान्य आहे का? मान्य नसेल तर त्यांनी उत्तर प्रदेश सरकारचा निषेध का केला नाही? अस सवालही काँग्रेस नेत्यांनी केला.
पोलीस दल जातीत विभागले
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, उत्तर प्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागासवर्गीय मुलींवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. पोलिसच त्यांना जाळून टाकत आहेत. पोलीस दल जातीमध्ये विभागले गेले आहे. ही अत्यंत धोकादायक बाब आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकार तातडीने बरखास्त करावे.
या आंदोलनात सार्वजनिक बांधकाम मंत्री
अशोक चव्हाण, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, माजी मंत्री नसीम खान, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, आ. झिशान सिद्दीकी, माजी मंत्री अनिस अहमद, बाबा सिद्दीकी, सरचिटणीस मोहन जोशी, सचिन सावंत, प्रदेश सचिव राजाराम देशमुख यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.
रामाचं नाव घ्यायचं कृती नथुरामाची करायची ही भाजपची पद्धत पुन्हा एकदा पुढे आली आहे. हाथरसमधील पीडित मुलीच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असताना राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी धक्काबुक्की करुन खाली पाडले. एका प्रमुख पक्षाच्या प्रमुखाला दिलेली ही वागणूक निंदनीय आहे.
- जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष,
राष्ट्रवादी काँग्रेस
उत्तर प्रदेश सरकारने केलेली कृती अत्यंत धक्कादायक आहे. याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाजप मागणी करते. आता भाजपने आत्मचिंतन करावे, आणि राष्ट्रपती राजवटीची गरज उत्तर प्रदेशात जास्त आहे हे तपासून पाहावे.
- खा. सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस
दलित, पीडित, शोषित
समाजातील मुलीवर अन्याय होतो. तिचा आक्रोश देशात पोहोचू नये यासाठी उत्तर प्रदेश सरकारने दडपशाही केली आहे. एका मुलीला आणि तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळणे महत्त्वाचे
आहे. ती सेलिब्रिटी नव्हती म्हणून
तिला न्याय नाकारण्याचा अधिकार रामाच्या नावाने राज्य करणाऱ्यांना
नाही.
- खा. संजय राऊत, खासदार शिवसेना
उत्तर प्रदेशातील
हाथरस येथील अत्याचाराची घटना पाशवी असून मानवतेला काळीमा फासणारी आहे. एरवी महाराष्टÑात थोडं कुठं काय झालं की आरडाओरड
करणारे, जाब विचारणारे
आत्ता गप्प का आहेत?
- राज ठाकरे, मनसे प्रमुख