ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 14 - उत्तर प्रदेशमध्ये महापुरुषांच्या जयंतीनिमित्त किंवा पुण्यतिथीनिमित्त मिळणाऱ्या सार्वजनिक सुट्ट्या लवकरच बंद केल्या जाणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनऊमध्ये भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली वाहिली. त्यावेळी त्यांनी ही मोठी घोषणा केली.
यावेळी बोलताना त्यांनी "आता महापुरुषांच्या नावाने मिळणाऱ्या सार्वजनिक सुट्ट्यांची परंपरा बंद व्हायला हवी असं म्हणत या निर्णयामुळे काहींना आक्षेप असेल याची कल्पना आहे, परंतु हे करणं आवश्यक आहे", अशा शब्दात मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी आपली भूमिका मांडली.
शाळांचं उदाहरण देताना ते म्हणाले, अशाप्रकारच्या सुट्ट्यांमुळे 220 दिवसांच्या जागी केवळ शैक्षणिक दिवस 120 झाले आहेत. असंच सुरू राहिलं तर एक दिवस शाळेसाठी कोणताही दिवस शिल्लक राहणार नाही, अशी भीती आदित्यनाथ यांनी व्यक्त केली. "उत्तर प्रदेशात राजकारणाच्या नावावर आतापर्यंत 42 सुट्ट्य़ा घोषित करण्यात आल्या आहेत. यात 17 सुट्ट्या जातीय गणिते लक्षात ठेवूनच दिल्या गेल्यात. सुट्ट्यांबाबत विचार केला तर उत्तर प्रदेश देशात प्रथम स्थानी आहे. या घोषित दिवसांना 52 शनिवार आणि रविवार जोडले तर 146 दिवस शासकीय कार्यालये बंद राहतील. यात कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या 15 भरपगारी रजा आणि 14 कॅज्युअल लिव्ह मोजल्या, तर जवळजवळ 175 दिवस सुट्टी मिळते. यानुसार कर्मचाऱ्यांना सुमारे 6महिने कार्यालयात जाण्याची गरजच नाही. या सुट्ट्या राजकीय संतुलनासाठी या सुट्ट्या मिळत आल्या आहेत. कदाचित याच सुट्ट्यांवर पहिली कुऱ्हाड कोसळेल", असेही आदित्यनाथ आपल्या भाषणात पुढे म्हणाले.
त्यामुळे ही परंपरा बंद करून महापुरुषांच्या जयंतीनिमित्त किंवा पुण्यतिथीनिमित्त विद्यालयांमध्ये त्या महापुरूषांच्या बद्दलचा एक किंवा दोन तासाचा एखादा कार्यक्रम घ्यावा त्यामुळे महापुरूषांविषयी माहितीही मिळेल असं ते म्हणाले.