प्रकाश बेळगोजीबेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्र यांची प्रदेशाध्यक्ष तर आर. अशोक यांची विरोधी पक्षनेतेपदी केलेली निवड अनेक भाजप नेत्यांना रुचलेली नाही.विजापूरचे आमदार असलेले बसनगौडा पाटील-यत्नाळ, गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी, अरविंद बेल्लद यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी या दोघांना बढती दिल्याबद्दल खुलेआम नाराजी व्यक्त केली आहे. भाजपचे वरिष्ठ नेते बी. एल. संतोष व रा. स्व. संघाला मानणाऱ्या सर्व आमदारांसाठी हा निर्णय आश्चर्यकारक होता. लिंगायतांवर मजबूत पकड असलेल्या आणि येडीयुराप्पा मुख्यमंत्री असेपर्यंत गेल्या अनेक विधानसभा निवडणुकांमध्ये ठामपणे त्यांच्या मागे उभ्या राहिलेल्या उत्तर कर्नाटकातील अनेक नेत्यांनी अशोक आणि विजयेंद्र यांच्या निवडीला विरोध दर्शवला आहे.यासंदर्भात पंचमसाली मठाचे प.पू. जयमृत्युंजय स्वामीजी यांनी राज्यातील पक्षाची दोन्ही उच्च पदे बंगळुरू आणि शिमोगा येथील नेत्यांना घेऊन भाजपने उत्तर कर्नाटकातील नेत्यांवर अन्याय केला आहे, असे म्हटले आहे. बसनगौडा पाटील यांच्यासारख्या नेत्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल भाजपवर जोरदार टीका करताना स्वामीजींनी त्या दोन पदांपैकी एक पद तरी उत्तर कर्नाटकाला द्यावयास हवे होते, असे मत व्यक्त केले आहे.गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी गेल्या शुक्रवारी झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. त्यांनी पक्ष निरीक्षकांची भेट घेऊन बी. एस. येडीयुराप्पा मी एक वेळ स्वीकारले असते मात्र त्यांच्या पुत्राला नाही, असे सांगितले. तसेच माझ्यापेक्षा लहान असलेल्या विजयेंद्र यांच्या हाताखाली मी कसे काम करणार? त्या पदासाठी पक्षाने ज्येष्ठ नेत्यांचा विचार करावयास हवा होता, असेही स्पष्ट केले.भारतीय जनता पक्ष एका घराण्याचा पक्ष झाला आहे, हे पक्षातील हिंदू कार्यकर्ते कदापि खपवून घेणार नाहीत, असे परखड मत फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जाणारे बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी विधिमंडळ पक्षाची बैठकीतून बाहेर पडल्यानंतर व्यक्त केले. उत्तर कर्नाटकातील लोक नेहमीच भाजपला संपूर्ण पाठिंबा देऊन मतदान करत असतात. मात्र पक्षातील चांगली पदे मात्र नेहमीच दक्षिण कर्नाटकातील नेत्यांना दिली जातात, असे दोन्ही पदांसाठी इच्छुक असलेले यत्नाळ म्हणाले.अशोक आणि विजयेंद्र यांच्या निवडीच्या माध्यमातून येडीयुराप्पा गट पक्षाची सूत्रे आपल्या हातात घेत आहे. असे भाजपमधील अनेक आमदारांना वाटते. गेल्या विधानसभा निवडणुकीत बी. एल. संतोष यांच्या नेतृत्वाखाली दारुण पराभव पत्करावा लागल्यामुळे भाजपसमोर येडीयुराप्पा यांच्यासमोर नमते घेण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय उरला नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
कर्नाटकात भाजप प्रदेशाध्यक्षपदावरून नाराजी, येडियुराप्पा यांच्या विरोधी गटात अस्वस्थता
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 1:39 PM