नवी दिल्ली : ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती प्रकरणात हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. ओमप्रकाश चौटाला यांना ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती प्रकरणी दिल्लीतील विशेष सीबीआय न्यायालयाने शुक्रवारी दोषी ठरवत चार वर्षांचा तुरुंगवास आणि 50 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. एवढेच नाही तर ओमप्रकाश चौटाला यांच्या चार मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
ओमप्रकाश चौटाला यांना कोर्टरूममधूनच ताब्यात घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणी ओमप्रकाश चौटाला यांच्यावतीने अपील दाखल करण्यासाठी १० दिवसांची मुदत मागितली होती, त्यावर न्यायाधीशांनी तुम्ही उच्च न्यायालयात जाऊ शकता, असे सांगितले. दरम्यान, गुरूवारी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. विशेष न्यायाधीश विकास धुल यांनी ओमप्रकाश चौटाला आणि सीबीआयच्या वकिलांच्या शिक्षेवरील युक्तिवाद ऐकला होता, ज्यांना 1993 ते 2006 या कालावधीत ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक अधिक संपत्ती मिळवल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले होते.
सुनावणीवेळी ओमप्रकाश चौटाला यांनी वृद्धापकाळ आणि वैद्यकीय कारणास्तव किमान शिक्षा देण्याची विनंती केली होती. मात्र, यातून समाजात संदेश जाईल, असे सांगत केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) जास्तीत जास्त शिक्षा देण्याची विनंती केली. सीबीआयने म्हटले आहे की, ओमप्रकाश चौटाला यांना दोषी ठरवण्यात आलेले हे दुसरे प्रकरण आहे.
26 मार्च 2010 रोजी सीबीआयने माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांच्याविरोधात कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते. ओम प्रकाश चौटाला यांनी 1993 ते 2006 या कालावधीत 6.09 कोटी रुपयांची मालमत्ता कथितरित्या जमा केली आहे, जी त्यांच्या वैध उत्पन्नापेक्षा खूपच जास्त आहे. याचबरोबर, 2019 मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांची 3 कोटी 68 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. या मालमत्तांमध्ये ओम प्रकाश चौटाला यांच्या मालकीचे फ्लॅट, भूखंड आणि जमिनीचा समावेश होता. जप्त केलेल्या मालमत्ता नवी दिल्ली आणि हरयाणातील पंचकुला आणि सिरसा जिल्ह्यातील आहेत. बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणात मनी लाँड्रिंग अंतर्गत नोंदवलेल्या एफआयआरच्या संदर्भात ही कारवाई करण्यात आली होती.
याआधी तिहारमध्ये 10 वर्षांची शिक्षा भोगली होती दरम्यान, माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांना जानेवारी 2013 मध्ये जेबीटी घोटाळ्यात दोषी ठरवण्यात आले होते. भ्रष्टाचार प्रतिबंधक प्रकरणात सात वर्षे आणि कट रचल्याबद्दल दोषी आढळल्यामुळे 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. गेल्या वर्षी जुलैमध्ये ओम प्रकाश चौटाला आपली शिक्षा पूर्ण करून दिल्लीच्या तिहार तुरुंगातून बाहेर आले होते.