नवी दिल्ली : फोर्टिस हेल्थकेअरचे जुने मालक आणि रॅनबॅक्सीचे माजी अध्यक्ष मलविंदर मोहन सिंह आणि शिविंदर मोहन सिंह यांच्यामधील मालमत्तेचा वाद वाढला आहे. मोठा भाऊ मलविंदर यांनी शिंविंदरने त्यांच्यावर बुधवारी हल्ला केल्याचा आरोप केला आहे. तर शिविंदरने विरोधी तक्रार करताना मलविंदर याने आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केला आहे.
मलविंदर यांनी व्हॉट्सअॅपवर एक व्हिडिओ टाकत या घटनेची माहिती दिली आहे. यामध्ये त्यांच्या हाताला मार लागल्याचेही दिसत आहे. यामध्ये शिविंदरने 5 डिसेंबरला सायंकाळी 6 वाजता दिल्लीतील 55, हनुमान रोडवर मारहाण केली. यामध्ये हाताला जखम झाली असून धमकीही दिल्याचा आरोप मलविंदर यांनी केला आहे. सुरक्षा पथकाने त्याला बाजुला करेपर्यंत शिविंदर धक्काबुक्की करत होता.
माध्यमांनुसार मलविंदर यांचे म्हणणे आहे की, शिविंदर प्रियस रियल एस्टेट कंपनीच्या बोर्ड मिटिंगमध्ये लक्ष घालण्याचा प्रयत्न करत होता. प्रियसने गुरिंदर सिंह ढिल्लन यांच्या कंपन्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला 2 हजार कोटींचे कर्ज दिले आहे. ढिल्लन हे राधा स्वामी सत्संग न्यासाचे अध्यात्मिक गुरु आहेत आणि दोन्ही भावांचे कुटुंबीय त्यांचे अनुयायी आहेत.
मलविंदर यांचे म्हणणे आहे की, हे कर्ज वसूल करण्य़ासाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली होती. मात्र शिविंदरने ऑफिसमध्ये येवून व्यत्यय आणला. शिविंदरचा प्रियसशी काहीही संबंध नाही. याबाबतची खबर मिळताच मलविंदर कार्यालयात दाखल झाले तेव्हा शिविंदरने त्यांच्यावर हल्ला केला. तर शिविंदरयांनी हे आरोप फेटाळून लावताना मलविंदरनीच हल्ला केल्याचा आरोप केला आहे.