उज्जैन: रामायण सर्किट स्पेशल ट्रेनमध्ये सेवा देणाऱ्या वेटर्सच्या पेहरावावर उज्जैनच्या साधू-संतांनी आक्षेप घेतला आहे. ट्रेनच्या वेटर्सना भगवे कपडे, धोतर, पगडी आणि रुद्राक्षाच्या माळा घालण्यात आल्या आहेत. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये वेटर संतांच्या वेशात लोकांना जेवण वाढताना आणि खरकटी भांडी उचलताना दिसत आहेत. यावरुनच साधू-संतांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. हा हिंदू संस्कृती आणि संतांना अपमान असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ट्रेन वेटर्सनी इतर कुठलेतरी कपडे घातले पाहिजेत अशा मागणीचे पत्र उज्जैनमधील संतांनी रेल्वेमंत्र्यांना लिहील आहे. 12 डिसेंबरपासून सुरू रेल्वेच्या पुढील प्रवासाला सुरुवात होणार आहे, त्यापूर्वी कपडे बदलावे अन्यथा रेल्वे रोको केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
वेटर्सचे कपडे त्वरित बदलण्याची मागणी
आखाडा परिषदेचे माजी सरचिटणीस परमहंस अवधेश पुरी महाराज यांनी वेटर्सचा पेहराव लवकरात लवकर बदलावा, अन्यथा 12 डिसेंबरला सुटणाऱ्या पुढील ट्रेनविरोधात हजारो हिंदूंच्यावतीने संत समाज आंदोलन करेल आणि रेल रोको केले जाईल, असे म्हटले आहे.
7500 किमीचा प्रवास 17 दिवसात
दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानकावरुन धावणाऱ्या या ट्रेनचा अयोध्या हा पहिला थांबा आहे. येथून धार्मिक यात्रा सुरू होते. अयोध्येतील प्रवाशांना नंदीग्राम, जनकपूर, सीतामढी मार्गे रस्त्याने नेपाळला नेले जाते. यानंतर प्रवाशांना रेल्वेने भगवान शिवाची नगरी काशी येथे नेले जाते. येथून बसने सीता संहिता स्थळ, प्रयाग, शृंगवरपूर आणि चित्रकूटसह काशीच्या प्रसिद्ध मंदिरांमध्ये नेले जाते.
चित्रकूटहून ही गाडी नाशिकला पोहोचते, जिथे पंचवटी आणि त्र्यंबकेश्वर मंदिराचे दर्शन घेतले जाते. नाशिक ते किष्किंधा शहर हंपी पर्यंत, जिथे श्री हनुमानाचे जन्मस्थान अंजनी पर्वतावर आहे आणि भेट दिली जाते. या ट्रेनचा शेवटचा थांबा रामेश्वरम आहे, जिथे तुम्ही धनुषकोटी पाहू शकता. रामेश्वरमहून धावणारी ही ट्रेन 17व्या दिवशी परतते. तुम्ही रेल्वे आणि रस्ते प्रवासाचा समावेश केला तर हा प्रवास 7500 किमीचा आहे.
खास तयार केलेले ट्रेनचे डबे
धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी 'देखो अपना देश' या उपक्रमांतर्गत IRCTC द्वारे रामायण सर्किट एक्सप्रेस ट्रेन चालवली जाते. या डीलक्स एसी टुरिस्ट ट्रेनद्वारे भगवान श्री रामाशी संबंधित सर्व धार्मिक स्थळांना भेटी दिल्या जातात. रामायण एक्सप्रेसची खास रचना करण्यात आली आहे. एसी कोच गाड्यांमध्ये बाजूचे बर्थ काढून आरामदायी खुर्ची-टेबल बसवण्यात आले आहेत. स्वतंत्र प्रसाधनगृहही बांधण्यात आले असून, त्यात आंघोळीचीही सोय आहे. ट्रेनमध्ये दोन जेवणासाठी दोन डायनिंग कोचदेखील आहेत.
12 डिसेंबरला पुढील ट्रेन ट्रिप
रामायण एक्स्प्रेसचा पुढील प्रवास 12 डिसेंबरला सुरू होणार आहे. यासाठी आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर ऑनलाइन बुकिंग करता येईल. बुकिंग प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर केले जाईल. एसी फर्स्ट क्लासमध्ये प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती 1 लाख 02 हजार 95 रुपये आणि सेकंड एसीमध्ये प्रवास करण्यासाठी 82 हजार 950 रुपये प्रति व्यक्ती भाडे निश्चित करण्यात आले आहे. 17 वर्षांवरील प्रत्येक प्रवाशाला कोविडच्या दोन्ही लसी घेणे आवश्यक आहे.