नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील एका रस्त्याला वि.दा. सावरकर यांचे नाव दिल्याने वाद निर्माण झाला आहे. जेएनयू स्टुडंट असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनकडे जाणाऱ्या रस्त्याला विद्यापीठ प्रशासनाने सावरकर यांचे नाव दिले आहे. मात्र या रस्त्याचे नाव पुन्हा बदलण्यात आले आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनकडे जाणाऱ्या मार्गावर वि.दा. सावरकर मार्ग असा फलक लावण्यात आला होता. विद्यापीठ कार्यकारी परिषदेनेच या रस्त्याला सावरकर यांचे नाव देण्याचा निर्णय घेतल्याचे कुलसचिव प्रमोद कुमार यांनी सांगितले. याआधी या रस्त्याला कोणतेही नाव देण्यात आलेले नव्हते. मात्र या कृतीचा एनएसयूकडून निषेध करण्यात आला आहे. तसेच मार्गाचे नावही बदलण्यात आल्याचे समजते.
एनएसयूने या मार्गाचे नावे बदलून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग केल्याचा दावा एनएसयूचे सचिव सायमन फारुकी यांनी केला. या संदर्भातील दोन फोटो त्यांनी ट्विट केले आहे. यामध्ये वि.दा. सावरकर मार्गाचे नाव बदलून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग केल्याचे दिसून येते.
या व्यतिरिक्त विद्यार्थी परिषदेची अध्यक्षा आईशी घोषने सावरकर यांचे नाव रस्त्याला देण्यावर आक्षेप घेतला आहे. ही बाब जेएनयूच्या वारसांसाठी लाजीरवानी आहे. सावरकर आणि त्यांच्या लोकांना जेएनयूच्या जवळपास कधीही स्थान नव्हते आणि राहणारही नाही, असंही आइशीने ट्विट करून म्हटले आहे.