चेन्नई : तामिळनाडूतल्या तुतिकोरिनचा स्टरलाइट कॉपर स्मेल्टर प्रकल्प तातडीने बंद करण्याचे आदेश तामिळनाडू प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत. प्रकल्पाचा वीजपुरवठाही गुरुवारी खंडित करण्यात आला आहे.या कंपनीविरोधातील आंदोलनात निदर्शकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मरण पावलेल्यांची संख्या आता १३ झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या गोळीबाराचा निषेध केला असून, ते तेथे जाण्याची शक्यता आहे. निदर्शकांवर गोळीबार करणाऱ्या पोलिसांचा व राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी उद्या, शुक्रवारी राज्य बंदचे आवाहन केले आहे. त्यामुळे सरकारने या परिसरात जमावबंदी लागू केली आहे. तुतुकोडी, तिरुनलवेली, कन्याकुमारी या जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा पाच दिवस बंद ठेवणार आहे.गोळीबाराच्या चौकशीचे आदेश देतानाच, मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी या आंदोलनामागे विरोधी पक्ष व समाजकंटकांचा हात असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे स्थानिक प्रचंड संतापले आहेत. आम्हाला समाजकंटक म्हणणे संतापजनक आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. (वृत्तसंस्था)तीन राज्यांनी नाकारलेला प्रकल्पस्टरलाइट कॉपर स्मेल्टिंग प्रकल्प महाराष्ट्र, गोवा, गुजरात या तीन राज्यांनी नाकारल्यानंतर तामिळनाडू राज्यात नेण्यात आला होता. दिल्ली येथील सेंटर फॉर सायन्स अॅण्ड एन्व्हायर्नमेंटने म्हटले आहे की, स्टरलाइट प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होईल, याची कल्पना असल्यामुळेच ३ राज्यांनी नकारघंटा वाजविली होती.
वादग्रस्त स्टरलाइट प्रकल्पाची वीज खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 1:38 AM