पक्षश्रेष्ठी आणि नाराजांतील वाद काँग्रेसमध्ये चिघळणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 05:54 AM2021-09-10T05:54:50+5:302021-09-10T05:55:18+5:30
समझोत्यासाठी पुढाकार नाही; पक्षांतर्गत मतभेद पुन्हा उघड
शीलेश शर्मा
नवी दिल्ली : काँग्रेसमधील २३ नाराज नेते व त्या पक्षाचे नेतृत्व यांच्यात निर्माण झालेला वाद मिटण्याऐवजी तो आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहे. नाराज नेत्यांशी समझोता करण्यास काँग्रेस पक्षश्रेष्ठी राजी नाहीत, असे वक्तव्य त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी नुकतेच केल्यानंतर पक्षांतर्गत मतभेद पुन्हा उघड झाले आहेत.
काँग्रेसच्या २३ नाराज नेत्यांमध्ये फुट पाडण्याचे काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी करत असलेले प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. काँग्रेस आणखी मजबूत व्हावी याचसाठी पक्षातील त्रुटी नाराज नेत्यांनी सर्वांसमोर मांडल्या होत्या, असेही कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे. कपिल सिब्बल यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त गेल्या आठवड्यात आयोजित केलेल्या पार्टीला काँग्रेसमधील असंतुष्ट नेते उपस्थित होते. पक्षामध्ये सर्व स्तरांवर निवडणुका घेऊन पदाधिकाऱ्यांची निवड केली जावी, ही मागणी या नेत्यांनी लावून धरली आहे. काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष असण्याची गरज आहे तसेच पक्षात संसदीय समितीची स्थापना केली जावी, अशीही नाराज नेत्यांची मागणी आहे.
गांधी कुटुंबीयांना नव्हते वाढदिवस पार्टीचे निमंत्रण
नाराज नेत्यांनी याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी विविध मुद्यांवर चर्चा केली होती. कपिल सिब्बल यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या पार्टीला विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही बोलाविले. मात्र राहुल यांच्यासहित गांधी कुटुंबातील एकाही सदस्याला पार्टीला उपस्थित राहाण्यासाठी कपिल सिब्बल यांनी निमंत्रण दिले नव्हते.