नवी दिल्ली : ई-काॅमर्स कंपन्या भारतात आल्या. मात्र, त्यांनी अतिशय निर्लज्जपणे भारतीय कायद्यांचे अनेकदा उल्लंघन केल्याची टीका केंद्रीय वाणिज्य व उद्याेगमंत्री पीयूष गाेयल यांनी केली. या कंपन्यांनी भारतीय कायद्यांचे पालन करावे तसेच पैसा किंवा दमदाटीचा वापर करू नये, असा इशाराही गाेयल यांनी दिला आहे. केंद्र सरकारकडून ई-काॅमर्स कंपन्यांसाठी सादर करण्यात आलेल्या नव्या नियमांचे गाेयल यांनी समर्थन केले. हे नियम ग्राहकांच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी बनविल्याचे गाेयल यांनी स्पष्ट केले.
गाेयल यांनी सांगतले की, भारतीय बाजारपेठेत आम्ही सर्वांचे स्वागत करताे. मात्र, त्यांनी भारतीय कायद्यांचे पालन केले पाहिजे. मात्र, बड्या ई-काॅमर्स कंपन्यांनी निर्लज्जपणे भारतीय कायद्यांचे उल्लंघन केले आहे. एकदा नव्हे तर वारंवार हा प्रकार घडल्याचे गाेयल म्हणाले. काेणत्याही कंपनीचे नाव न घेता गाेयल म्हणाले, की या कंपन्यांकडे प्रचंड पैसा आहे. त्यामुळे सुरुवातीला भारतीय बाजारपेठेतील माेठा हिस्सा काबीज करण्यासाठी त्यांच्याकडून माेठी गुंतवणूक हाेते. मात्र, त्याचवेळी या कंपन्या उद्धटपणाचे वर्तन करतात. केवळ आर्थिक शक्ती असल्यामुळे त्यांना साेडून देणे चुकीचे आहे. ई-काॅमर्स कंपन्या मालाच्या किमतींवर नियंत्रण ठेवू पाहत असून, त्यास भारतात परवानगी नसल्याचे गाेयल म्हणाले. भारतीय ट्रेडर महासंघाने ई-काॅमर्स कंपन्यांसाठी बनविलेल्या कायद्यांचे समर्थन केले आहे. दबावाखाली हे कायदे कमकुवत हाेऊ देऊ नका, असे पत्रही महासंघाने पंतप्रधान माेदी यांना पाठविले आहे.
ब्रिटनमध्ये कंपन्यांविरुद्ध चौकशी सुरूस्पर्धा आयाेगाच्या चाैकशीला या कंपन्या प्रतिसाद देत नाहीत. उलट त्याविराेधात काेर्टात जातात. अमेरिका आणि ब्रिटनसारख्या देशांमध्ये ई-काॅमर्स कंपन्यांसाठी अविश्वास कायद्यांवर काम सुरू आहे. ब्रिटनमध्येही स्पर्धा आणि बाजारपेठ प्राधिकरणांनी या कंपन्यांविरुद्ध चाैकशी सुरू केली आहे. या बड्या तंत्रज्ञान आणि ई-काॅमर्स कंपन्यांचे वास्तव आता जगापुढे येत असल्याचे गाेयल म्हणाले.