मुजफ्फरनगर - उत्तर प्रदेशच्या रतनपूरी येथील बडसू गावांत घोड्यावर बसताना हर्ष फायरींग करताना नवरदेवाच्या नातेवाईकासह त्याचा 3 वर्षीय चिमुकलाही गंभीर जखमी झाला आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी जखमींना सीएचसी रुग्णालयात दाखल केले. तेथून जखमी पिता-पुत्रास मोदीपुरम आणि खतौली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मोदीपुरम रुग्णालयात उपचार घेत असताना युवकाचा मृत्यू झाला. त्यामुळे, लग्नात मोठं विघ्न आल्याने लग्नाच्या आनंदावर विरजन पडलं.
बडसू गावातील रेशन दुकानदार रविंद्र यांचे सुपुत्र अभिषेकच्या घोड्यावर बसण्याचा कार्यक्रम सुरू होता. मंगळवारी कसैढ़ी गावातील गंगोह जनपद सहारनपुर येथे लग्नाची वरात जाणार होती. त्यावेळी, नवरदेव घोड्यावर बसताना नवरदेवाकडील एका युवकाने बंदुकीने हर्ष फायरींग केलं. ही घुडसवारी करत असताना नवरदेवाच्या बहिणीचा पती सोनू हा आपल्या 3 वर्षीय मुलासह सहभागी झाला होता. सोनू हा आजमपुर, सहारनपुर गावचा रहिवाशी आहे. या हर्ष फायरींगमध्ये एक गोळी सोनूच्या पोटात गेली. यावेळी, सोनूचा तीन वर्षीय चिमुकला त्याच्या काखेत असल्याने गोळीचा छर्रा त्या चिमुकल्याच्या डोक्यावर आणि गुडघ्याला लागल्याने तोही जखमी झाला.
हर्ष फायरींगच्या या अपघाताने परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला. नातेवाईकांची धावपळ आणि रडारडी सुरू झाली. स्थानिकांनी एकच गर्दी केली, तर पोलीस इन्स्पेक्टर विनोद कुमार सिंह यांनीही घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमी पिता-पुत्रास सार्वजनिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथून सोनूला मोदीपूरम येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, गंभीर जखमी असल्याने सोनूचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, सोनू आपल्या कुटुंबात एकुलता एक मुलगा होता. तर, आपल्या मुलाच्या लग्नाच जावयाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने अभिषेकच्या आई-वडिलांनही अतोनात दु:ख झाले आहे.
दरम्यान, हर्ष फायरींगच्या घटनेचा तपास करण्यात येत आहे. अद्याप या घटनेसंदर्भात कुठलिही तक्रार पोलिसात आली नाही. व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या माध्यमातून या घटनेचा तपास करुन आरोपीचा शोध घेतला जाईल, असे पोलीस अधिकारी विनोद कुमार यांनी सांगितले.