बीड : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना (मग्रारोहयो) अंतर्गत सुरू झालेल्या डासमुक्ती अभियानात काही गटविकास अधिकाऱ्यांचा निरूत्साह असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पाच तालुक्यांमध्ये कामे थंडावली आहेत.पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी खास बीडसाठी ५० शोषखड्ड्यांसाठी एकच कार्यारंभ आदेश मंजूर करून घेतला. त्यानंतर शोषखड्डे खोदण्याच्या कामाला अनेक गावांमध्ये गतीही मिळाली होती. मात्र, प्रशासकीय अनास्थेमुळे हे अभियान थंडावण्याच्या मार्गावर आहे. बीड, केज, धारूर, आष्टी, माजलगाव या तालुक्यांमध्ये तर अतिशय उदासीनता असल्याचे समोर आले आहे. अंबाजोगाई, परळी, शिरूर कासार या तालुक्यांमध्ये मात्र शोषखड्डे खोदण्याचे काम वेगाने सुरू आहे. एका शोषखड्ड्यासाठी २१०० रूपयापर्यंतचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. सांडपाणी मुरविण्याबरोबरच डासांनाही हद्दपार करणारी ही अनोखी योजना आहे. नांदेड जिल्ह्याचा पॅटर्न उचलून जिल्हा डासमुक्त करण्याचा संकल्प नुकताच पालकमंत्री मुंडे यांनी केला होता. मात्र, गटविकास अधिकाऱ्यांकडून असहकार्य असल्याने कामे धिम्या गतीने सुरू आहेत.अन्यथा कारवाईचा बडगाडासमुक्तीसाठी अनेक गावांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पालकमंत्र्यांनी ही योजना जिल्ह्यात राबविण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केलेला आहे. त्याचा लाभ सामान्यांना मिळवून देण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी पुढे येण्याची गरज आहे. या कामात असहकार्य करणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांना नोटिसा दिल्या जातील, असे जि. प. च्या रो.ह.यो. कक्षाचे गटविकास अधिकारी राजेंद्र मोराळे यांनी सांगितले. कामात हलगर्जी झाल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, अशी तंबीही त्यांनी दिली. (प्रतिनिधी)
डासमुक्ती अभियानात बीडीओंचा निरुत्साह
By admin | Published: March 14, 2016 12:04 AM