भाजपा नेत्याकडून मतदारांना पैशांचे वाटप, गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडलं
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 06:10 PM2018-11-28T18:10:14+5:302018-11-28T18:10:54+5:30
सावेर विधानसभा मतदारसंघातील हतोनिया फंटे येथे ही घटना उघडकीस आली आहे.
इंदौर - मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांवेळी भाजपा नेत्याला पैसे वाटताना पकडण्यात आलं आहे. मतदारांना लोभ दाखवून आपल्याकडं खेचण्याचा प्रयत्न करण्यात आला. मंगळवारी सावेर विधानसभा क्षेत्रात पैसे वाटल्याचं उघडकीस आलं आहे. येथील गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार एका भाजपा नेत्याने गावातील काही मंडळींना घेऊन पैसे वाटप केले आहेत. मात्र, गावकऱ्यांनी गोंधळ करताच, या नेत्याने तेथून पळ काढल्याचे समजते.
सावेर विधानसभा मतदारसंघातील हतोनिया फंटे येथे ही घटना उघडकीस आली आहे. भाजापा नेते देवराजसिंह येथील मतदारांना आमिष दाखवण्यासाठी येथे आले होते. सिंह यांच्यासोबत इतरही साथीदार होते. त्यावेळी, याबाबत काही स्थानिकांना माहिती मिळाली. त्यानंतर, स्थानिक नेत्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी सिंह यांना पैसे वाटप करताना रंगेहाथ पकडण्यात आले. सिंह यांच्या गाडीत 2.5 लाख रुपये रोख रक्कमही आढळून आली. याप्रकरणी पोलिसांनी खटला दाखल करुन घेतला. पण, तोपर्यंत भाजपा नेते तेथून निघून गेले होते. त्यामुळे पोलिसांच्या उशिरा येण्यामुळेच पैसे वाटप करणारे भाजपा नेते पळून गेल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
दरम्यान, देवराज सिंह यांनी याप्रकरणी पोलीस स्थानकात जाऊन पोलिसांची भेट घेतली. तसेच मी जमिन खरेदीच्या व्यवहारासाठी तेथे गेलो होतो, असा दावा सिंह यांनी केला आहे. देवराज सिंह हे लोकसभा सदस्य आहेत.