कर्जत : अहमदनगर जिल्हा सहकारी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील इच्छुक उमेदवारांनी मतदारांच्या भेटी घेत, श्रेष्ठींशी संवाद साधत मोर्चेबांधणी सुरू केली आहे. श्रेष्ठी कोणाला हिरवा कंदील देतात, या निर्णयाकडे तालुक्याचे लक्ष केंद्रीत झाले आहे.अहमदनगर जिल्हा सहकारी बँक निवडणुकीसाठी विक्रमसिंह देशमुख, आंबादास पिसाळ, राजेंद्र फाळके, बाळासाहेब साळुंके, काकासाहेब तापकीर, महेंद्र गुंड, ॲड. शिवाजीराव अनभुले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.जिल्हा सहकारी बँकेचे विद्यमान संचालक बापूसाहेब देशमुख यांनी यावेळी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांच्याऐवजी त्यांचे नातू विक्रमसिंह देशमुख यांनी उमेदवारी दाखल केली. बापूसाहेब देशमुख यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने त्यांच्या विरोधकांनी कंबर कसली आहे. एकास एक लढत व्हावी, यासाठी कोणता उमेदवार सक्षम राहील, कोणाच्या नावावर एकमत करायचे, यासाठी बैठका झाल्या. बाळासाहेब थोरात यांच्या पॅनलची उमेदवारी मिळवण्यासाठी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी माजी मंत्र्यांसमोर समर्थकांसह शक्तीप्रदर्शन केले. देशमुख हे थोरात यांच्या पॅनलमधून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. देशमुख विरोधी गटाची बैठक एकत्रित अहमदनगर येथे पार पडली. या बैठकीत उमेदवारीबाबत चाचपणी झाली. परंतु श्रेष्ठी काय निर्णय घेतात, यावरच येऊन सर्व थांबले.कर्जत पंचायत समितीच्या माजी सभापती मिनाक्षी साळुंके यांनी त्यांच्या कार्यकाळात त्यांच्या कामाचा ठसा उमटवला. त्यांना महिला मतदारसंघातून बाळासाहेब थोरात यांच्या पॅनलमधून उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा कर्जतकरांना आहे. अर्ज भरलेल्या उमेदवारांनी मतदारांशी प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन संपर्क वाढवला आहे. सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी कोणत्या पॅनलची कोणाला मिळतेय, याबाबत अद्याप अनिश्चितता असली तरी सर्वांनीच निवडणुकीची तयारी जोमाने सुरू केली आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.
जिल्हा बँक निवडणुकीसाठी कर्जतमध्ये मोर्चेबांधणी
By admin | Published: April 20, 2015 1:41 AM