ऑनलाइन लोकमत
मेरठ, दि. ५ - सध्याच्या तरुणाईमध्ये सेल्फीची प्रचंड क्रेझ आहे. हटके सेल्फी काढण्याच्या नादात काही जणांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. १८ वर्षाच्या फराझ अहमदने असा कुठलाही धोकादायक सेल्फी काढला नसला तरी, जिल्हा दंडाधिका-यासोबत सेल्फी काढण्याच्या इच्छेपायी त्याला तीन दिवस तुरुंगात काढावे लागले.
फराझला उत्तरप्रदेशातील बुलंद शहराच्या जिल्हा दंडाधिकारी बी. चंद्रकला यांच्यासोबत सेल्फी काढायचा होता. यासाठी तो चंद्रकला यांच्याजवळ जाऊन सेल्फी काढत असताना चंद्रकला यांनी त्याची कानउघडणी केली.
जिल्हा दंडाधिकारी असण्याबरोबरच मी एक महिला आहे आणि प्रत्येकानेच महिलेचा सन्मान राखला पाहिजे असे चंद्रकला यांनी सांगितले. कमालपूर गावात रहाणारा फराझ अहमद गावातल्या ज्येष्ठांसोबत कामानिमित्त चंद्रकला यांच्या कार्यालयात आला होता.
चंद्रकला यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करणा-या फराझला अनेकदा समजही देण्यात आली. या अटकेबद्दल बोलताना चंद्रकला म्हणाल्या की, युवकाने फक्त मी अधिकारी नाही तर, महिला आहे हे सुध्दा लक्षात घ्यायला पाहिजे होते.
प्रत्येक महिलेचा स्वत:चा सन्मान असतो आणि प्रत्येकाने त्याचा आदर केला पाहिजे. आजच्या युवकांची मला चिंता वाटते ते अनेकदा बेजबाबदारीने वागतात. त्यांनी जबाबदारीने वागले पाहिजे.
सेल्फी काढला म्हणून त्या युवकाला अटक झालेली नाही. त्याला मोबाईलमधून त्याने काढलेले फोटो डिलीट करायला सांगितल्यानंतर त्याने जो गोंधळ घातला त्यासाठी त्याला अटक झाल्याचे चंद्रकला यांनी सांगितले. सोमवारी अटक झाल्यानंतर फराझ अहमदची गुरुवारी जामिनावर सुटका झाली.