दोहा/कतार : कतारमधीलन्यायालयाने आठ माजी भारतीय नौसैनिकांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. ते गेल्या एक वर्षापासून तुरुंगात कैद आहेत. ही शिक्षा अत्यंत धक्कादायक असून, त्यांची सुटका करण्यासाठी कायदेशीर मार्ग शोधले जात आहेत, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. आठ भारतीयांवर नेमके काय आरोप आहेत, हे कतार सरकारने सार्वजनिक केलेले नाहीत. या घटनेवरुन आता देशातील मान्यवरांनी केंद्र सरकारकडे अधिकाऱ्यांच्या सुटकेची मागणी केली आहे. खासदार आणि टीम इंडियाचा माजी गोलंदाज हरभजनसिंग यानेही मोदी सरकरला विनंती केली आहे.
कतारच्या न्यायालयाने भारताच्या ८ माजी अधिकाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावल्याचे वृत्त मन अस्वस्थ करणारे आहे. भारत सरकारला माझी विनंती आहे की, सरकारने सर्व पर्यायांचा शोध घेऊन त्या माजी अधिकाऱ्यांना परत मायदेशी आणावे. त्यांना न्याय मिळायलाच पाहिजे, असे हरभजनसिंगने म्हटले आहे. भज्जीने ट्विट करुन सरकारकडे ही विनंतीपर मागणी केली आहे.
‘ते’ आठ अधिकारी नेमके कोण?
कतारमध्ये ज्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे त्यांच्यामध्ये कॅप्टन नवतेजसिंग गिल, कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कॅप्टन बिरेंद्र कुमार वर्मा, कमांडर पूर्णेंदू तिवारी, कमांडर सुगनाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित नागपाल आणि नाविक रागेश यांचा समावेश आहे.
भारत सरकारचे म्हणणे काय?
कतारच्या कनिष्ठ कोर्टाने अल दाहरा कंपनीच्या आठ भारतीय कर्मचाऱ्यांशी संबंधित खटल्यात आपला हा निर्णय दिला आहे. आम्ही कुटुंबातील सदस्य आणि कायदेशीर टीमच्या संपर्कात आहोत. आम्ही सर्व कायदेशीर पर्यायांचा विचार करत आहोत, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.